
मुंबई, 14 जानेवारी (हिं.स.)। गूगलने आपल्या गूगल होम अॅपसाठी महत्त्वाचे अपडेट जारी करून स्मार्ट होम रूटिन्स अधिक सक्षम बनवले आहेत. या अपडेटमध्ये नव्या ऑटोमेशन टूल्सचा समावेश असून त्यात स्टार्टर्स, कंडिशन्स आणि अॅक्शन्सच्या विस्तारित पर्यायांद्वारे स्मार्ट डिव्हाइसेसवर अधिक अचूक नियंत्रण ठेवता येणार आहे. आता वापरकर्ते टीव्ही, स्मार्ट अॅप्लायन्सेस, सिक्युरिटी सिस्टीम्स, रोबोट व्हॅक्यूम आणि स्मार्ट ब्लाइंड्ससारख्या डिव्हाइसेसचे नियंत्रण अधिक सहज करू शकतील.
गूगलचे चीफ प्रॉडक्ट ऑफिसर अनीश कट्टुकरण यांनी एक्स वर केलेल्या घोषणेत सांगितले की, या अपडेटमुळे 20 नव्या स्टार्टर्स आणि अॅक्शन्सच्या मदतीने अधिक गुंतागुंतीची आणि तपशीलवार ऑटोमेशन्स तयार करता येतील, ज्यामुळे स्मार्ट होम अधिक बुद्धिमान आणि उपयोगी ठरेल.
अपडेटनंतर मीडिया प्लेबॅक नियंत्रण, स्मार्ट अॅप्लायन्सेसची स्थिती तपासणे आणि विविध अॅक्शन्स ऑटोमेट करणे शक्य झाले आहे. उदाहरणार्थ टीव्ही सुरू झाल्यावर लाइट्स 50 टक्के डिम करणे, वॉशिंग मशीनचे सायकल पूर्ण झाल्यावर अलर्ट मिळणे, ठरलेल्या वेळी सिक्युरिटी सिस्टीम आर्म करणे, रोबोट व्हॅक्यूमला पॉज, रिझ्यूम किंवा डॉकिंग कमांड देणे आणि स्मार्ट ब्लाइंड्स उघडणे किंवा बंद करणे अशा सुविधा उपलब्ध झाल्या आहेत. स्मार्ट बल्ब्सवर लाइट इफेक्ट्स लागू करण्याचाही पर्याय देण्यात आला आहे. अॅप्लायन्स स्टेटस फीचर सध्या वॉशर, ड्रायर आणि कॉफी मशीनसाठी उपलब्ध असून रनिंग, पॉज्ड किंवा एरर स्थिती तपासता येते, मात्र स्मार्ट ओव्हन, रोबोट व्हॅक्यूम आणि रोबोट मॉप्ससाठी हे फीचर अद्याप उपलब्ध नाही. तसेच डिव्हाइसेस ऑन-ऑफ करणे, अॅप्लायन्सेस सुरू किंवा थांबवणे, व्हॉल्यूम नियंत्रण आणि इतर अनेक अॅक्शन्स आता थेट ऑटोमेशनमध्ये समाविष्ट करता येणार आहेत.
गूगलनं या अपडेटबाबत वापरकर्त्यांकडून फीडबॅक देण्याचं आवाहन केलं असून इव्हेंट डिटेल पेजवरील फीडबॅक बटणाद्वारे थंब्स अप-डाउन किंवा फॅमिलियर फेस बॅनरवरून रिपोर्ट पाठवता येईल. पुढील काही आठवड्यांत आणखी नवे फीचर्स जाहीर करण्याचीही कंपनीची योजना आहे. हे अपडेट Nest, Gemini for Home आणि इतर स्मार्ट डिव्हाइसेससह एकत्रित कार्य करणाऱ्या गूगल होम अॅपला अधिक लवचिकता देत असून स्मार्ट होम वापरकर्त्यांचं दैनंदिन आयुष्य आणखी सोपं आणि सुलभ करण्याची क्षमता यात आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Suraj Chaugule