
मुंबई, 14 जानेवारी (हिं.स.)। भारतीय टेक कंपनी नॉइजने आपल्या स्मार्टवॉच लाइनअपचा विस्तार करत नॉइजफिट प्रो 6आर हे नवे स्मार्टवॉच भारतात लाँच केले आहे. आकर्षक राऊंड डायल असलेले हे स्मार्टवॉच देशात विक्रीस उपलब्ध झाले असून ते अॅमेझॉन, फ्लिपकार्ट तसेच कंपनीच्या अधिकृत gonoise.com या वेबसाइटवरून खरेदी करता येणार आहे.
लेदर, सिलिकॉन आणि मेटल अशा तीन प्रकारच्या स्ट्रॅप व्हेरिएंट्समध्ये हे घड्याळ उपलब्ध आहे. लेदर आणि सिलिकॉन स्ट्रॅप व्हेरिएंटची किंमत 6,999 रुपयांपासून सुरू होते, तर मेटल स्ट्रॅप व्हेरिएंटची किंमत 7,999 रुपये ठेवण्यात आली आहे. लेदर स्ट्रॅप ब्राउन आणि ब्लॅक, मेटल स्ट्रॅप टायटॅनियम आणि क्रोम ब्लॅक तर सिलिकॉन स्ट्रॅप ब्लॅक आणि स्टारलाइट गोल्ड अशा विविध रंगांमध्ये उपलब्ध असल्याने वापरकर्त्यांना त्यांच्या शैलीनुसार पर्याय निवडता येतो.
या स्मार्टवॉचमध्ये 42 मिमी राऊंड डायलसह 1.46 इंच AMOLED डिस्प्ले देण्यात आला आहे. 1,000 निट्सपर्यंत पीक ब्राइटनेसमुळे तेजस्वी सूर्यप्रकाशातही डिस्प्ले स्पष्ट दिसतो. अँड्रॉइड आणि iOS दोन्ही स्मार्टफोनशी ते सुसंगत आहे. IP68 रेटिंगमुळे धूळ आणि पाण्यापासून संरक्षण मिळते तसेच कंपनीच्या दाव्यानुसार हे स्मार्टवॉच 100 मीटरपर्यंत पाणी प्रतिरोधक आहे. उजव्या बाजूस दिलेले क्राउन आणि नेव्हिगेशन बटण ऑपरेशन अधिक सुलभ करते.
नॉइजफिट प्रो 6आरमध्ये आरोग्यविषयक ट्रॅकिंगसाठी अनेक आधुनिक सुविधा देण्यात आल्या आहेत. हार्ट रेट मॉनिटरिंग, ब्लड ऑक्सिजन लेव्हल ट्रॅकिंग, स्ट्रेस ट्रॅकिंग, स्लीप स्कोअर यांसह रेडिनेस स्कोअरदेखील उपलब्ध आहे, जो शरीराची पुनर्बांधणी आणि शारीरिक श्रमासाठीची तयारी मोजतो. महिलांसाठी मेंस्ट्रुअल सायकल ट्रॅकिंगची सुविधाही यामध्ये देण्यात आली आहे. बिल्ट-इन GPS आणि स्ट्रावा इंटिग्रेशनसह हे स्मार्टवॉच नॉइज AI प्रोला सपोर्ट करते, ज्याद्वारे हेल्थ इनसाइट्स, डिव्हाइस कंट्रोल आणि AI-जनरेटेड वॉच फेसेसचा वापर करता येतो.
कंपनीच्या मते, नियमित वापरात या घड्याळाची बॅटरी लाइफ सात दिवसांपर्यंत तर स्टँडबाय मोडमध्ये 30 दिवसांपर्यंत टिकते. शून्य ते शंभर टक्के चार्जिंग फक्त दोन तासांत पूर्ण होते. आकर्षक डिझाइन, दमदार बॅटरी, प्रगत हेल्थ फीचर्स आणि AI सपोर्टमुळे नॉइजफिट प्रो 6आर स्मार्टवॉच भारतीय स्मार्टवेअरेबल बाजारात नवा पर्याय म्हणून समोर आले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Suraj Chaugule