
तेहरान , 14 जानेवारी (हिं.स.)।इराणमध्ये सुरू असलेल्या आंदोलन आणि हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर इराणचे निर्वासित युवराज रेझा पहलवी सातत्याने चर्चेत आहेत. ते आंदोलनकर्त्यांना पाठिंबा देत असून रस्त्यावर ठामपणे उभे राहण्याचे आवाहन करत आहेत. ताज्या संदेशात त्यांनी आंदोलनकर्त्यांना संघर्ष सुरू ठेवण्याची हाक दिली आहे. त्यांनी इराण सरकारला इशारा दिला की त्यांच्या अत्याचारांचा हिशोब लवकरच घेतला जाईल. तसेच त्यांनी इराणी लष्करालाही आंदोलनकर्त्यांच्या बाजूने उभे राहण्याचे आवाहन केले असून, आता वेळ फार उरलेली नाही, असे म्हटले आहे. त्याचबरोबर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या विधानांमुळे आंतरराष्ट्रीय स्तरावरही खळबळ उडाली आहे.
सोशल मीडियावर जारी केलेल्या एका पोस्टमध्ये रेझा पहलवी म्हणाले, “माझ्या देशबांधवांनो, जग आता केवळ तुमचा आवाज आणि धैर्य ऐकत नाही, तर त्याला प्रतिसादही देत आहे. तुम्ही अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांचा संदेश ऐकला असेल—मदत येत आहे. तुम्ही जे आतापर्यंत केले आहे तेच करत संघर्ष सुरू ठेवा. या सरकारला सर्व काही सामान्य असल्याचा भ्रम निर्माण करू देऊ नका. या संपूर्ण नरसंहारानंतर आमच्यात आणि या सरकारमध्ये रक्ताची नदी वाहते आहे. या गुन्हेगारांची नावे लक्षात ठेवा, कारण त्यांना नक्कीच शिक्षा मिळेल.”
रेझा पहलवींनी इराणी लष्करालाही उद्देशून म्हटले की, “तुम्ही इराणचे सैन्य आहात, इस्लामिक प्रजासत्ताकाचे नाही. तुमच्याकडे आता फारसा वेळ उरलेला नाही, त्यामुळे शक्य तितक्या लवकर आंदोलनकर्त्यांच्या बाजूने उभे राहा.”
रेझा पहलवी हे इराणचे शेवटचे शाह यांचे पुत्र आहेत. 1979 मध्ये झालेल्या इस्लामिक क्रांतीनंतर शाह यांची सत्ता गेली आणि तेव्हापासून रेझा पहलवी निर्वासित जीवन जगत आहेत.इराणमध्ये डिसेंबरच्या अखेरीस आर्थिक संकटामुळे सुरू झालेली आंदोलने अजूनही सुरू असून, आतापर्यंत या आंदोलनांमध्ये दोन हजारांहून अधिक लोक ठार झाल्याचा दावा करण्यात येत आहे.
दरम्यान, मंगळवारी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी आंदोलनकर्त्यांना आंदोलन सुरू ठेवण्याचे आवाहन केले होते. आपल्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर त्यांनी लिहिले होते, “इराणी देशभक्तांनो, विरोध सुरू ठेवा, तुमच्या संस्थांवर ताबा मिळवा. मदत येत आहे.” तसेच इराणमध्ये राहणाऱ्या अमेरिकन नागरिकांना तात्काळ देश सोडण्याचा सल्ला दिला. या विधानानंतर अमेरिका लवकरच इराणविरोधात मोठी कारवाई करू शकते, असे तर्क लावले जात आहेत.ट्रम्प यांनी कथित अत्याचारांसाठी जबाबदार असलेल्या लोकांची नावे जतन करून ठेवण्याचे सांगितले आणि त्यांना याची किंमत मोजावी लागेल, असा इशाराही दिला.
ट्रम्प यांनी असा दावाही केला की, आंदोलनकर्त्यांच्या हत्या थांबत नाहीत तोपर्यंत इराणी अधिकाऱ्यांसोबत होणाऱ्या सर्व बैठकांना त्यांनी स्थगिती दिली आहे. यासोबतच त्यांनी ‘MIGA’ हा नारा पुन्हा एकदा दिला. मात्र, ही मदत नेमकी कोणत्या स्वरूपाची असेल, याबाबत त्यांनी काहीही स्पष्ट केले नाही. यासंदर्भात विचारले असता त्यांनी, “याचे उत्तर नंतर कळेल,” असे सांगितले.
ट्रम्प यांनी हेही नमूद केले की, अलीकडील आंदोलनांमध्ये किती लोकांचा मृत्यू झाला आहे, याची अचूक संख्या कोणाकडेही उपलब्ध नाही. दरम्यान, इराणमधील परिस्थितीकडे आंतरराष्ट्रीय समुदायाचे लक्ष लागून राहिले असून, येत्या काही दिवसांत घडामोडी अधिक वेग घेण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode