नाशिकमध्ये राज्य बॅडमिंटन खेळाचा महाकुंभ
नाशिक, मुंबई, नागपूर, कोल्हापूर, पुणे, ठाणेच्या खेळाडूंची उत्तम कामगिरी नाशिक, 14 जानेवारी (हिं.स.) - नाशिक जिल्हा बॅडमिंटन असोसिएशनच्या वतीने आणि महाराष्ट्र बॅडमिंटन असोसिएशनच्या मार्गदर्शनाखाली नाशिक येथे रविवार दिनांक ११ जानेवारी ते १५ जानेवार
नाशिकमध्ये राज्य बॅडमिंटन


नाशिक, मुंबई, नागपूर, कोल्हापूर, पुणे, ठाणेच्या खेळाडूंची उत्तम कामगिरी

नाशिक, 14 जानेवारी (हिं.स.) - नाशिक जिल्हा बॅडमिंटन असोसिएशनच्या वतीने आणि महाराष्ट्र बॅडमिंटन असोसिएशनच्या मार्गदर्शनाखाली नाशिक येथे रविवार दिनांक ११ जानेवारी ते १५ जानेवारी, २०२६ दरम्यान आयोजित ३५ वर्षे आणि त्यावरील विविध नऊ वयोगटाच्या महाराष्ट्र राज्यस्तरीय बॅडमिंटन स्पर्धेच्या आजच्या चवथ्या तीसऱ्या दिवशी ३५ वर्षे, ४० वर्षे, ४५ वर्षे आणि ५० वर्षे या विविध गटांचे सामने खेळविले गेले. नाशिकच्या गंगापूर रोड येथील केन्सिंगटन क्लब येथे सुरु असलेल्या या स्पर्धेमध्ये आज खेळल्या गेलेल्या विविध गटांच्या सामन्यात नाशिकच्या खेळाडूंनी उत्तम कामगिरी करून उपांत्य फेरीत आपला प्रवेश निश्चित केला. पुरुषांच्या ४० वर्षे गटामध्ये एकेरी प्रकारात नाशिकचे दुसरे मानांकन असलेले चंदन जाधव याने उपउपांत्य करीत सुंदर खेळाचे प्रदर्शन करून नागपूरच्या बाळकृष्ण भावे याचा २१-१६ आणि २१- १३ अश्या सरळ दोन सेटमध्ये पराभव करून उपांत्य फेरीत प्रवेश केला. पुरुषांच्या ३५ वर्षे गटाच्या दुहेरी प्रकारात नाशिकच्या प्रणव सवाई आणि सुजय आघारकर आणि मुंबईच्या सागर पाटील आणि सोमनाथ सोनावणे यांच्यातील उपउपांत्य लढत फारच चुरशीची झाली. नाशिकच्या जोडीने एकमेकांमध्ये चांगला समन्वय राखत पहिल्या सेटमध्ये आघाडी घेत हा सेट २१-१३ असा जिंकून १-० अशी आघाडी मिळविले. दुसऱ्या सेटमध्ये मात्र मुंबईच्या जोडीने संयमाने खेळ करत हा सेट २१-१६ असा जिंकून १-१ अशी बरोबरी साधली. तिसऱ्या निर्णायक सेटमध्ये १०-१० अशी बरोबरी होती, त्यानंतर मात्र नाशिकच्या प्रणव आणि सुजय या जोडीने कधी खोलवर शटल मारून तर कधी नेटजवळ ड्रॉप्स टाकत हा सेट २१-१७ असा जिंकून हा सामनाही जिंकत उपांत्य फेरीत आपले स्थान पक्के केले. पुरुषांच्या ४० वर्षे गटामध्ये दुहेरी प्रकारात नाशिकच्या प्रशांत दुधेंडिया आणि सौरभ गाडगीळ आणि मुंबई उपनगरच्या मितेश अरोरा आणि विकास शेट्टी यांच्यात खेळल्या गेलेल्या उपउपांत्य सामन्यात २-२ अशी बरोबरी असतांना मुंबईचा खेळाडू जखमी झाल्यामुळे या सामन्यात नाशिकच्या जोडीला पुढे चाल मिळाली.

पुरुषांच्या ३५वर्षे गटामध्ये एकेरी प्रकारात निनाद कामात( कोल्हापूर, , ओंकार पालकर ( (सातारा), सोमनाथ सोनावणे आणि जसविंदर सिंग (दोघेही मुंबई शहर) यांनी आपले उपउपांत्य सामने जिंकून उपांत्य फेरीत प्रवेश मिळविला. पुरुषांच्या ४० वर्षे गटात एकेरी प्रकारात नाशिकचा चंदन जाधव, निगेल दास (ठाणे), निखिल कोल्हटकर (ठाणे), दीपक जैत (मुंबई) यांनी उपउपांत्य सामन्यात विजय मिळवत उपांत्य फेरीत प्रवेश केला. पुरुषांच्या ४५ वर्षे गटामध्ये एकेरी प्रकारात जयेंद्र ढोले (नागपूर), विनीत डबकं (पुणे), कौशिक वर्तक (मुंबई), धीरेंद्र मौर्य (मुंबई) आणि विनीत दाबक (पुणे) यांनीही आपले उपउपांत्य सामने जिंकत उपांत्य फेरीत प्रवेश मिळविला.

महिलांमध्ये मुंबईचे वर्चस्व :- महिलांच्या ३५ वर्षे गटामध्ये एकेरी प्रकारात मुंबईच्या पल्लवी मित्तल आणि वरदा दीक्षित यांनी उपउपांत्य फेरीत विजय मिळवत उपांत्य फेरी गाठली. याचप्रमाणे महिलांच्या ४० वर्षे गटात एकेरी प्रकारात मुंबईच्या पूजा झालाणी,फरहा त्रेहान, सौमी बोस आणि रम्या वेंकट या चारही खेळाडूंनी सुंदर खेळ करत आपले उपउपांत्य सामने जिंकत उपांत्य फेरीत प्रवेश मिळविला. महिलांच्या ४५ वर्षे गटामध्ये मुंबईच्या सोनल भट्टड, प्रिया आंबेकर आणि पूजा श्रीराम या तीन खेळाडूंनी आणि नागपूरच्या ज्योती वानखडे हीने आपले उपउपांत्य सामने जिंकत उपांत्य फेरीत प्रवेश केला.

उद्या सर्वच गटांचे अंतिम सामने खेळविले जातील अशी माहिती स्पर्धेच्या आयोजकांनी दिली.

या स्पर्धा महाराष्ट्र बॅडमिंटन असोसिएशन यांच्या अधिकृत नियमावलीनुसार खेळविल्या जात आहेत.

या स्पर्धेला योनेक्स सनराईस यांनी पुरस्कृत केले आहे.

या स्पर्धाच्या सूत्रबद्ध आयोजनासाठी महाराष्ट्र बॅडमिंटन असोसिएशनचे अध्यक्ष अरुण लाखनी, कार्याध्यक्ष शिरीष बोराळकर, उपाध्यक्ष मंगेश काशीकर, राज्य सचिव सिद्धार्थ पाटील, उपाध्यक्ष

सुधीर गाडगीळ, पंकज ठाकूर, ओंकार हजारे, मुंबईचे सचिन भारती, नाशिक बॅडमिंटन असोसिएशनचे अध्यक्ष राधेश्याम मुंदडा, सचिव पराग एकांडे, वरिष्ठ उपाध्यक्ष डॉ. शर्मिला कुलकर्णी, उपाध्यक्ष मिलिंद जोशी, उपाध्यक्ष योगेश एकबोटे, सहसचिव दिलीप लोंढे, खजिनदार समीर रहाळकर,कार्यकारी सदस्य चंदन जाधव, संदीप म्हात्रे आदी परिश्रम घेत आहेत. याचबरोबर डॉ. सुचिता बच्छाव, अश्विन सोनावणे, विशाल शाह, उदय एकांडे, प्रमोद रानडे, अनंत जोशी, रिषभ गोलिया, आदित्य आर्डे, हर्षद टेम्बुर्णीकर आदी या स्पर्धा यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेत आहेत.

आजचे निकाल :

*पुरुष एकेरी : उपउपांत्य* *सामने :*

३५ वर्षे -

१) निनाद कामात ( कोल्हापूर ) विजय विरुद्ध अमोल हिंदळेकर ( मुंबई)

२) ओंकार पालेकर (सातारा) विजय विरुद्ध अभिनव कुंडलवार (नागपूर)

३) सोमनाथ सोनावणे (मुंबई शहर) विजय विरुद्ध क्षितिज अवस्थी (सांगली)

४) जसविंदर सिंग (मुंबई शहर) विजय विरुद्ध ऋतुराज देशपांडे (पुणे )

४० वर्षे - उपउपांत्य सामने :

१) निगेल दास (मुंबई शहर) विजय विरुद्ध पीयूष अगरवाल (रायगड)

२) निखिल कोल्हटकर (ठाणे) विजय विरुद्ध दिव्यचंद्र सूर्यवंशी (पुणे)

३) चंदन जाधव (नाशिक) विजय विरुद्ध बाळकृष्ण भावे (नागपूर)

४) दीपक जेटली (मुंबई शहर) विजय विरुद्ध अमित धुर्वे (जळगांव)

---------------

हिंदुस्थान समाचार / GOSAVI CHANDRASHEKHAR SUKDEV


 rajesh pande