बीड जिप शैक्षणिक सहल : ३३ जण इस्रोला देणार भेट
११ विद्यार्थी करणार नासाची सफर बीड, 15 जानेवारी (हिं.स.)। बीड जिल्हा परिषदेच्या शाळांमधील विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन निर्माण व्हावा आणि त्यांना जागतिक दर्जाच्या संशोधन प्रक्रियेची ओळख व्हावी या हेतूने जिल्हा परिषदेने एक अत्यंत महत्त्व
बीड जिप शैक्षणिक सहल : ३३ जण इस्रोला देणार भेट


११ विद्यार्थी करणार नासाची सफर

बीड, 15 जानेवारी (हिं.स.)।

बीड जिल्हा परिषदेच्या शाळांमधील विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन निर्माण व्हावा आणि त्यांना जागतिक दर्जाच्या संशोधन प्रक्रियेची ओळख व्हावी या हेतूने जिल्हा परिषदेने एक अत्यंत महत्त्वाकांक्षी उपक्रम हाती घेतला आहे. जिल्हा परिषदेच्या इयत्ता ५ वी ते ८ वीच्या गुणवंत विद्यार्थ्यांसाठी अमेरिकेतील 'नासा' अंतरिक्ष केंद्र आणि देशांतर्गत श्रीहरिकोटा येथील उपग्रह प्रक्षेपण केंद्राची शैक्षणिक सहल आयोजित करण्यात आली आहे.

या विशेष उपक्रमांतर्गत विद्यार्थ्यांची निवड करण्यासाठी केंद्र, तालुका आणि जिल्हा स्तरावर त्रिसूत्री परीक्षांचे आयोजन करण्यात येणार आहे. पहिली केंद्रस्तरीय परीक्षा १ मार्च २०२६ रोजी वस्तुनिष्ठ स्वरूपात घेतली जाईल, ज्यातून सर्वोत्तम १० विद्यार्थ्यांची निवड तालुकास्तरासाठी होईल. नंतर ८ मार्च रोजी तालुकास्तरीय, १५ मार्च २०२६ रोजी जिल्हास्तरीय परीक्षा पार पडेल. या प्रक्रियेतून इस्रो सहलीसाठी प्रत्येक

तालुक्यातून ३ विद्यार्थी (एकूण ३३) आणि नासा सहलीसाठी प्रत्येक तालुक्यातून प्रथम येणारा १ विद्यार्थी (एकूण ११) यांची निवड केली जाणार आहे. निवड झालेल्या विद्यार्थ्यांचा हा प्रवास पूर्णपणे हवाई मार्गे (विमानाने) होणार आहे.

देशांतर्गत सहलीमध्ये श्रीहरिकोटा, भुंबा स्पेस म्युझियम आणि बेंगलोर येथील म्युझियमचा समावेश असेल, तर आंतरराष्ट्रीय सहलीमध्ये अमेरिकेतील केनेडी स्पेस सेंटर, न्यूयॉर्क, वॉशिंग्टन डी. सी. आणि नायगारा फॉल्स यांसारख्या ठिकाणांना भेटी दिल्या जातील. या परीक्षेच्या पूर्वतयारीसाठी शाळांमध्ये दररोज अतिरिक्त तास घेऊन विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. मुख्य कार्यकारी अधिकारी जितीन रहमान यांच्या मार्गदर्शनाखाली ही संपूर्ण प्रक्रिया राबवली जात असून, या उपक्रमामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या स्वप्नांना जागतिक क्षितिज मिळणार आहे. यात जास्तीत-जास्त विद्यार्थ्यांनी सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis


 rajesh pande