
जळगाव, 15 जानेवारी, (हिं.स.) - जळगाव जिल्ह्यात चोरीछुपे पद्धतीने गावठी कट्टे (देशी बनावटीची शस्त्रे) बाळगण्याच्या घटनांमध्ये वाढ होत असल्याचे निदर्शनास येत असून या बेकायदेशीर शस्त्रांमुळे कायदा-सुव्यवस्थेला धोका निर्माण होऊ नये यासाठी पोलिसांकडून कारवाया केल्या जात आहे. अशातच भुसावळ शहरातील न्यायालयाबाहेरील सार्वजनिक रस्त्यावर संशयास्पद स्थितीत उभ्या असलेल्या एका महिलेकडून गावठी कट्टा व मोटारसायकल जप्त करण्यात आली आहे. ही कारवाई भुसावळ शहर पोलिसांनी केली.
पोलिसांना मिळालेल्या गुप्त माहितीनुसार, न्यायालयाबाहेरील भुसावळ–यावल मार्गावरील सार्वजनिक रस्त्यावर एक महिला संशयास्पद अवस्थेत उभी असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पोलिसांनी तात्काळ छापा टाकून पंचांसमक्ष तपासणी केली. यावेळी संबंधित महिलेकडून गावठी कट्टा आढळून आला. संबंधित महिलेचे नाव सुभमा अशोक धामणे (वय ३२, रा. तापीनगर, एमआयडीसी ऑफिससमोर, प्लॉट नं. ३, भुसावळ) असे असून तिच्याकडील मोटारसायकलचीही झडती घेण्यात आली. तपासादरम्यान अंदाजे २० हजार रुपये किमतीचा गावठी कट्टा व सुमारे ६० हजार रुपये किमतीची मोटारसायकल असा एकूण ८० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या प्रकरणी महिला पोलिस कॉन्स्टेबल दीपाली रामलखन यादव यांनी फिर्याद दिली असून, संबंधित महिलेविरुद्ध भुसावळ शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / मनोहर कांडेकर