
छत्रपती संभाजीनगर, 16 जानेवारी (हिं.स.)फुलंब्री तालुक्यातील वानेगाव येथे ३१ वर्षीय विवाहितेचा विहिरीत बुडून मृत्यू झाल्याची घटना उघडकीस आली. या घटनेने वानेगाव परिसरात मोठी खळबळ उडाली. विवाहितेच्या सासरच्या मंडळींनी मारहाण करून तिला विहिरीत फेकून दिल्याचा आरोप मृत महिलेच्या माहेरच्या नातेवाइकांनी केला. नातेवाइकांनी केलेल्या आरोपांमुळे वानेगाव येथील वातावरण तणावपूर्ण बनले. या घटनेतील आरोपींवर गुन्हा दाखल करून त्यांना तातडीने अटक करण्यात यावी, या मागणीसाठी मृत
विवाहितेच्या नातेवाइकांनी फुलंब्री पोलिस ठाण्यासमोर मृतदेह ठेवून जवळपास साडेचार तास ठिय्या आंदोलन केले. अखेर सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल झाल्यानंतर वानेगाव येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. सुनीता अण्णा भोकरे (वय ३१, रा. वानेगाव, ता. फुलंब्री, जि. छत्रपती संभाजीनगर) असे मृत विवाहितेचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सिल्लोड तालुक्यातील मोढा खुर्द येथील शिवाजी गवळी यांची ती मुलगी असून, बारा वर्षांपूर्वी तिचा विवाह वानेगाव येथील अण्णा भोकरे यांच्याशी झाला होता. सुनीता आणि अण्णा भोकरे यांना एक मुलगा आणि एक मुलगी अशी दोन अपत्ये आहेत. सुनीता घराबाहेर पडली होती. मात्र, बराच वेळ होऊन गेल्यानंतरही ती परत न आल्याने सायंकाळनंतर तिचा शोध घेण्यात आला. गावाजवळील विहिरीत तिचा मृतदेह आढळला.
वानेगाव पोलिसांनी मृतदेह फुलंब्री ग्रामीण रुग्णालयात आणला. मात्र, माहेरच्या नातेवाइकांनी सासरच्या मंडळींनी खून केल्याचा आरोप करीत येथे शवविच्छेदन करण्यासाठी नकार दिला. त्यानंतर इन-कॅमेरा शवविच्छेदनाची मागणी करून मृतदेह छत्रपती संभाजीनगर येथील घाटी रुग्णालयात नेण्यात आला. तेथेही काही काळ गोंधळ झाला. अखेर शवविच्छेदन झाल्यानंतर रुग्णवाहिकेतून मृतदेह थेट फुलंब्री पोलिस ठाण्यात आणण्यात आला.
पोलिस ठाण्यासमोर मृतदेह ठेवून 'आरोपींना अटक करा व खुनाचा गुन्हा दाखल करा,' अशी जोरदार मागणी नातेवाइकांनी केली. पोलिस निरीक्षक संजय सहाणे, सहायकपोलिस निरीक्षक सुनील इंगळे यांनी समजावण्याचा प्रयत्न केला. दरम्यान, कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी दंगा काबू पथक तैनात करण्यात आले. अखेर पतीसह सहा जणांविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला. आरोपी ताब्यात घेतल्याचे व्हिडिओ कॉलद्वारे दाखविल्यानंतर नातेवाइकांचे समाधान झाले.
हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis