
धुळे, 15 जानेवारी (हिं.स.) शहरात बंदी असलेला नायलॉन मांजा विक्रीसाठी साठवून ठेवल्याप्रकरणी गुन्हे शाखेने कारवाई करत दोघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. या कारवाईत ३६०० रुपये किंमतीचा नायलॉन मांजाचा साठा जप्त करण्यात आला.
पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, रात्री सुमारे ९.३० ते १०.४० वाजण्याच्या सुमारास शहरातील संतोषी माता चौकात, एका बंद टपरीच्या आडोश्याला सार्वजनिक ठिकाणी आरोपी नायलॉन मांजा विक्रीसाठी बाळगत असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार धुळे गुन्हे शाखेने छापा टाकून कारवाई केली. या प्रकरणी रोहित आत्माराम मोहिते (२१) रा. महिंदळे, ता. जि. धुळे व दुर्गेश राजु शंकपाल रा. पद्मानगर, साक्री रोड, धुळे यांच्याकडून वेगवेगळ्या रंगाचे नायलॉन मांजाचे मोठे रोल (बोबीन) जप्त करण्यात आले.
शासनाने नायलॉन मांजाच्या साठवणूक, विक्री व वापरावर बंदी घातलेली असतानाही तसेच जिल्हाधिकारी यांच्या मनाई आदेशाचे उल्लंघन करून आरोपी आर्थिक फायद्यासाठी हा माल बाळगत असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. या प्रकरणी धुळे शहर पोलीस ठाण्यात दोघांविरुद्ध पर्यावरण संरक्षण कायदा १९८६ चे कलम ५ व १५ तसेच बीएनएस कलम २२३ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस करीत आहेत.
---------------
हिंदुस्थान समाचार / मनोहर कांडेकर