
नांदेड, 15 जानेवारी, (हिं.स.)। सिंदखेड पोलीस ठाण्याच्या हद्दीत अवैधरीत्या गौवंश वाहतूक करणाऱ्या वाहनावर सिंदखेड पोलिसांनी कारवाई करत २ लाख ४७ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असून संबंधित आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
जिल्हा पोलीस अधिक्षक अविनाश कुमार, अपर पोलीस अधिक्षक श्रीमती अर्चना पाटील, अपर पोलीस अधिक्षक सुरज गुरव तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी डी. एस. हाके यांच्या मार्गदर्शनाखाली सिंदखेड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रमेश जाधव, पोलीस जमादार गोविंद कदम, पोलीस कर्मचारी संदीप वानखेडे व संजय शेंडे यांच्या पथकाने गुप्त माहितीच्या आधारे सापळा रचून संशयित वाहनाची तपासणी केली. तपासणीदरम्यान मॅक्स पिकअप वाहन (क्र. MH 26AH4326) मध्ये अवैधरीत्या गौवंश वाहतूक होत असल्याचे आढळून आले. या प्रकरणी वाहन चालक संतोष भिकू पवार (५२) याच्याविरुद्ध महाराष्ट्र पशुसंरक्षण कायदा १९७६ तसेच भारतीय दंड विधानाच्या संबंधित कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जप्त करण्यात आलेल्या मुद्देमालामध्ये वाहतूक करणारे वाहन व गौवंश समावेश असून त्याची एकूण किंमत २,४७,००० रुपये इतकी आहे.
सदर जनावरांची क्रूर पद्धतीने वाहतूक केली जात असल्याचे निदर्शनास आले असून ही गौवंश कत्तलखान्याकडे नेत असल्याचा संशय आहे. त्या दृष्टीने पुढील तपास सुरू असल्याची माहिती सहाय्यक पोलीस निरीक्षक रमेश जाधव यांनी दिली. अवैध जनावर वाहतुकी विरोधात पुढेही कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचा इशारा पोलिस प्रशासनाने दिला आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Sangita Hanumant Rao Chitanis