
काँग्रेसचे ४३ तर वंचित ४ असे ४७ तर भाजपा २२ व राष्ट्रवादी (अजित पवार गट) १ विजयी
लातूर, 16 जानेवारी (हिं.स.)।
राज्याचे लक्ष लागलेल्या लातूर शहर महानगरपालिकेच्या निवडणुकीत निर्वादीतपणे काँग्रेस पक्षाने बहमत मिळवण्यात यश मिळाले आहे. काँग्रेस पक्षाचे ४३ उमेदवार विजयी झाले, वंचितचे ४ उमेदवार विजयी झाले. काँग्रेस व वंचित यांची लातुरात आघाडी होती. यावेळी भाजपाचे २२ उमेदवार विजयी झाले तर अजित पवार गट राष्ट्रवादीने एका जागेवर समाधान मानावे लागले.
ज्यावेळी लातूर शहर महानगरपालिकेची निवडणूक जाहीर झाली. त्यावेळी भाजपाला चांगले यश मिळेल असे वाटत होते. तसे सकारात्मक वारे वाहत असताना भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी जे वक्तव्य केले त्यामुळे बदलाचे वारे वाहू लागले'विलासरावांच्या आठवणी पुसल्या जातील' या एका वाक्याने भाजपाविरोधात वातावरण वाहू लागले आणि याचाच फायदा काँग्रेसला मिळाला. विद्यमान काँग्रेसचे आमदार माजी मंत्री अमित देशमुख यांनी वंचित बहुजन पार्टीशी आघाडी करून जे परिश्रम घेतले त्याचा फायदा काँग्रेसला मिळाला आहे. या निवडणुकीत निलंग्याचे माजी मंत्री व आमदार संभाजीराव पाटील निलंगेकर यांच्या हाती प्रचाराची सुत्रे दिली होती
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांची मोठी सभा झाली तरीही राष्ट्रवादीला एका जागेवर विजय मिळवता आला. विक्रांत गोजमगुंडे हे पुर्वीचे काँग्रेसचेच कार्यकर्ते होते त्यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला होता. लातूर जिल्ह्यात अजित पवार राष्ट्रवादी पार्टीचे माजी मंत्री व आमदार संजय बनसोडे व बाबासाहेब पाटील मंत्री असताना केवळ एका जागेवर समाधान मानावे लागले आहे.
लातूर जिल्ह्यात आमदार व माजी मंत्री संभाजी पाटील निलंगेकर, औशाचे आमदार अभिमन्यू पवार, ग्रामीणचे आमदार रमेशअप्पा कराड यांनी यावेळी मोठे परिश्रम घेतले. लातूरमध्ये राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सह बावनकुळे आदी मान्यवरांच्या सभा झाल्या असताना लातूरकरांनी भाजपाला नाकारले याकडे दुर्लक्ष करता येत नाही. भाजपाने आत्मपरीक्षण केले पाहिजे, असा विचार निष्ठावंत भाजपा कार्यकर्त्यांनी व्यक्त केला आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis