
पुणे, 16 जानेवारी (हिं.स.)।
महानगरपालिकांचे निकाल आज जाहीर होत आहेत. मुंबईसह अनेक महापालिकांमध्ये भाजपा-शिवसेनेने (शिंदे) आघाडी घेतली आहे. पुणे आणि पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेसाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाशी युती केली होती. युतीमध्ये असताना त्यांनी पिंपरी चिंचवड महापालिकेत भाजपावर भ्रष्टाचाराचे आरोपही केले होते. मात्र प्रचारातील आरोप-प्रत्यारोपाचा मतपेटीत फारसा लाभ झालेला नसल्याचे दिसत आहे.
१६५ नगरसेवक असलेल्या पुणे महानगरपालिकेत भाजपाने सर्वाधिक जागा जिंकल्या आहेत. तर अजित पवार आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीला सन्मानजनक जागा मिळू शकलेल्या नाहीत. त्यामुळे पुण्यात एकत्र येऊनही घड्याळ आणि तुतारीला मतदारांनी नाकारल्याचे दिसत आहे.
पिंपरी चिंचवडमध्येही हीच परिस्थिती आहे. १२८ नगरसेवक असलेल्या पिंपरी-चिंचवडमध्ये भाजपाने बहुमतापेक्षाही अधिक जागांवर आघाडी घेतली आहे. त्याखाली अजित पवारांना जागा मिळाल्याचे दिसत आहे. तर शरद पवारांच्या राष्ट्रवादीला इथे फारशी चमक दाखवता आलेली नाही.
---------------
हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु