‘हिंद दी चादर’ गुरु तेगबहादुर साहिब यांच्या गौरवशाली इतिहासाचे स्मरण
‘हिंद दी चादर’,श्री गुरु तेग बहादुर साहिबजी यांच्या शहिदीला ३५० वर्षे पूर्ण होत असल्याने महाराष्ट्र शासन आणि श्री गुरु तेग बहादुर साहिबजी ३५० वी शहिदी समागम राज्यस्तरीय समितीमार्फत गेल्यावर्षी ७ डिसेंबर रोजी झालेल्या देखण्या आयोजनानंतर २४ आणि २५ ज
Hindi di chadar


‘हिंद दी चादर’,श्री गुरु तेग बहादुर साहिबजी यांच्या शहिदीला ३५० वर्षे पूर्ण होत असल्याने महाराष्ट्र शासन आणि श्री गुरु तेग बहादुर साहिबजी ३५० वी शहिदी समागम राज्यस्तरीय समितीमार्फत गेल्यावर्षी ७ डिसेंबर रोजी झालेल्या देखण्या आयोजनानंतर २४ आणि २५ जानेवारी २०२६ रोजी मान्यवरांच्या उपस्थितीत नांदेड येथे भव्य अध्यात्मिक कार्यक्रमाचे आयोजन होत आहे. श्री गुरु तेग बहादुर साहिबजी यांनी स्वाभीमान आणि देश रक्षणासाठी दिलेले बलिदान अनन्य साधारण आहे. त्यांच्या परिवारातील सदस्यांनीही देशासाठी शहादत दिली. हा गौरवशाली इतिहास सर्वांसाठी प्रेरणादायी आहे. त्याचे स्मरण करणारा आणि गुरुंनी देशासाठी दिलेल्या बलिदानावर प्रकाश टाकणारा हा लेख…

कश्मीरचा सुभेदार हा शिखांचे नववे गुरु तेगबहादुर साहिब यांच्या मदतीसाठी गेले. ‘ना पेह देना ! ना पेह सेना’ म्हणत (घाबरायचे नाही व घाबरवयाचेही नाही) कश्मीरींच्या रक्षणासाठी गुरु तेगबहादुर साहिब यांनी थेट तत्कालीन सत्तेला आवाहन दिले व दिल्लीकडे कुच केली. आग्रा येथेच तेगबहादुरांना अटक करण्यात आली.दिल्लीला आणून त्यांना धर्मांतराची बळजबरी करण्यात आली. गुरु तेगबहादुरांनी त्यास नकार देऊन लाल किल्ल्यासमोरील चांदणीचौकात बलिदान दिले. त्यांचे हे बलिदान इतिहासात अमर झाले व भारतभूमीचे कवच म्हणून त्यांना ‘हिंद दी चादर’म्हणून ओळखले जाते. सत्य व अहिंसेचे प्रेषित असलेल्या तेगबहादुरांनी बलिदान देऊन मानवी स्वातंत्र्याचा व स्वतःस पटेल तो धर्म आचरण्याचा आदर्श भारतीयांना घालून दिला.

श्री गुरु तेग बहादुर साहिब यांच्या सोबत अनेक समाज उभे होते विशेषत: सिकलीगर, बंजारा, लबाना, मोह्याल, सिंधी समाजांनी या संघर्षात मोलाचे योगदान देत तेगबहादुर साहेबांनी दिलेल्या देश व मानवतेच्या रक्षणाची शिकवण सर्वदूर पोचवली. भाई मतीदास, भाई सतीदास आणि भाई दयाल गुरु तेग बहादुरांच्या आत्मसन्मानासाठी आणि गुरुनिष्ठेसाठी शहीद झाले. हे समाज सेवाभाव, साहस आणि श्रद्धेसाठी ओळखले जातात. दिल्लीच्या ऐतिहासिक लाल किल्ला परिसरातील चांदणी चौकात सीसगंज गुरुद्वारा सर्व भारतीयांसाठी प्रेरणास्त्रोत ठरला आहे. याच ठिकाणी गुरु तेगबहादुरांनी तत्कालीन सत्तेला आपल्या प्राणांच्या आहुतीतून भारतीयांच्या एकीचा व सद्भावनेचा संदेश दिला. २५ मे १६७५ रोजी सत्ताधाऱ्यांच्या आज्ञेनुसार गुरु तेगबहादुरांचे शिर अमानुषपणे धडापासून वेगळे करण्यात आले आणि ‘जो कोणी तेगबहादुरांचे उत्तर कार्य पार पाडेल त्याला व त्याच्या कुटुंबीयांना कठोर शिक्षा करण्यात येईल,’ असा फतवा काढला.

अशा दहशतीच्या वातावरणामध्ये ढवळून निघालेले भारतीय मन नव्या उमेदीने उभे राहण्यासाठी धडपडू लागले. सत्तेची अवाज्ञा करून भाई जेतासिंह यांनी त्यांचे ‘शिर’आनंदसाहेब दरबार येथे शिखांचे दहावे गुरू आणि गुरू तेगबहादुरांचे पुत्र गुरू गोविंदसिंह यांच्या सुपूर्द केले. इकडे भाई लखीशाह बंजारा यांनी मुलगा नाथईय्याजी यांच्या मदतीने गुरू तेगबहादुरांचे ‘धड’ दिल्लीतीलच रकाबगंज गावात आणले व आपल्या राहत्या घरात ते ठेवून घरालाच अग्नी दिला. त्यानंतर त्याच ठिकाणी पवित्र अस्थी जमिनीत पुरल्या आज तिथेच ‘रकाबगंज गुरुद्वारा’उभा आहे.

त्याग व शौर्याचे प्रतीक ‘सीसगंज’ आणि ‘रकाबगंज’ गुरुद्वारा

सरदार बघेलसिंह यांनी १७८३ मध्ये दिल्ली सर करून लाल किल्ल्यावर कब्जा मिळवला आणि गुरू तेगबहादुरांच्या शहीदस्थळी सीसगंज गुरूद्वारा बांधण्यात आला. पुढे १९३० रोजी याच गुरूद्वाऱ्याचे पुनर्निर्माण करण्यात आले. स्वधर्माची ज्योत भारतीयांमध्ये तेवत ठेवण्याकरिता व प्रसंगी बलिदान देण्याचा संदेश देणारा सीसगंज गुरूद्वारा भारतीयांचे मुख्य श्रद्धास्थान ठरले आहे. दिल्लीच्या ऐतिहासिक लाल किल्ला परिसात स्थित सीसगंज गुरुद्वारा हा दिगंबर जैन अतिशय क्षेत्र लालमंदिरापासून सुरु होणाऱ्या चांदणीचौकाकडील रस्त्यावर आहे, तर संसद भवनाच्या मागील भागात रकाबगंज गुरुद्वारा स्थित आहे.

शीख धर्मियांचे मार्गदर्शक दहा गुरु आहेत. यापैकी दोन गुरु हे तेग बहादुरांचे आप्त आहेत. गुरु तेगबहादुर हे शिखांचे नववे गुरू असून सहावे शीखगुरू हरगोविंद यांचे ते सर्वात धाकटे पुत्र व शिखांचे दहावे व शेवटचे गुरू गोविंदसिंह यांचे ते पिता होत. तेगबहादुरांचा जन्म अमृतसर येथे झाला. वयाच्या ८ व्या वर्षी कर्तारपूर येथील लालचंदजी खत्री यांची कन्या गुजरी यांच्याशी तेगबहादुरांचा विवाह झाला. त्यांचे मूळ नाव त्यागमल होते. लहानपणीच त्यांना वैराग्य प्राप्त झाले. गृहस्थ असूनही ते वडिलांच्या मृत्युनंतर बकाला येथे जाऊन विरक्त वृत्तीने राहू लागले.

शिखांचे आठवे गुरू हरकिशन यांच्या निधनानंतर १६६४ मध्ये तेगबहादुर यांना नववे गुरू म्हणून गादीवर बसविण्यात आले. त्यांनी स्वतःसाठी शिवालिक पर्वतराजीत एक नगर वसविले आणि तिथे आपली गादी स्थापून ते धर्मप्रचारासाठी यात्रा करू लागले. हे नगर आनंदपूर म्हणून पुढे शिखांचे प्रसिद्ध व पवित्र क्षेत्र बनले. पाटणा येथे त्यांचे पुत्र गोविंदसिंह यांचा जन्म झाला. पुढे शिखांचे दहावे व शेवटचे गुरू गोविंदसिंह म्हणून ते उदयास आले.

तेगबहादुर यांच्या कुटुंबातील सात सदस्यांचे बलिदान

देशहितासाठी प्राणांचे बलिदान देणारे गुरु तेग बहादुर यांनी मोठा आदर्श घालून दिला. त्यांचीच शिकवण पुढे घेऊन जात त्यांच्या कुटुंबीयांनीही बलिदान दिले. आनंदपूरच्या लढायांनंतर सरदार वजीर खानाने गुरू गोविंदसिंग यांच्यावर हल्ला केला.यात मोठे दोन साहिबजादे अजीतसिंग आणि जुझारसिंग यांनी सरदाराच्या सैन्यासमोर शौर्याने लढत वीरगती प्राप्त केली. छोटे साहिबजादे जोरावरसिंग आणि फतेहसिंग यांना त्यांच्या आजी माता गुजरीजींसोबत सरहिंदच्या थडग्यात कैद करण्यात आले. वजीर खानाने त्यांना थंडीच्या रात्री उघड्यावर ठेवले आणि नंतर जिवंतपणे भिंतीत बंद करून मारले. या बलिदानाचे स्मरण करण्यासाठी केंद्र शासनाने २१ ते २७ डिसेंबर हा 'बलिदान सप्ताह' आणि २६ डिसेंबर हा 'वीर बाल दिवस' म्हणून घोषित केला व देशभर तो साजरा केला जात आहे. शिखांचे दहावे व शेवटचे गुरु, गुरु गोविंद सिंग यांनी १४ युद्धे लढली. १७०८ मध्ये नांदेड येथे देश रक्षणासाठी लढताना ते शहीद झाले.

गुरु तेगबहादुरांनी आसामपासून काश्मीरपर्यंत आपल्या सद्विचारांचा प्रसार केला. त्यांनी विविध विषयांवर ११६ पद्ये रचली. ही पद्ये पुढे गुरू गोविंदसिगांनी गुरु ग्रंथसाहिबात अंतर्भूत केली. यांतील ५९ पद्ये ‘शबद’ (स्तोत्रे) आणि ५७ पद्ये ‘श्लोक’ आहेत. त्यांच्या रचनेत वैराग्य व क्षमाशील वृत्तीचा उत्कृष्ट आविष्कार आढळतो. अहिंसा व सत्याचे प्रेषित असलेल्या तेगबहादुरांनी प्राण त्याग करून मानवी स्वातंत्र्याचा व स्वतःस पटेल तो धर्म आचरण्याचा आदर्श भारतीयांना घालून दिला. त्यांच्या बलिदानाने भारतीयांमध्ये जी अस्मिता निर्माण झाली तिला इतिहासात तोड नाही. तेगबहादुर साहिब यांच्या शहिदीला ३५० वर्षे पूर्ण होत असल्याच्या निमित्ताने यावर्षी भारतभर मोठया प्रमाणात विविध कार्यक्रम आखण्यात आले आहेत.

‘हिंद दी चादर’श्री गुरु तेग बहादुर साहिबजी यांच्या ३५० व्या शहिदी समागमानिमित्त राज्यभर विविध प्रबोधनपर उपक्रम राबविण्यात येत आहेत. याअंतर्गत नागपूर येथील नारा परिसरातील सुरेश चंद्र सुरी मैदानावर ७ डिसेंबर २०२५ रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. श्री गुरु तेग बहादुर साहिबजी यांच्यावर भारतीय डाक विभागामार्फत विशेष टपाल तिकीट जारी करण्यात आले. सिंधी आणि पंजाबी समाजाच्या इतिहासाचे दर्शन घडविणाऱ्या ऐतिहासिक शस्त्रांचे प्रदर्शन लावण्यात आले. विदर्भ आणि छत्तीसगढ मधील शीख, सिकलीगर, बंजारा, लबाना, मोह्याल, वाल्मीकी आणि सिंधी समाजबांधवानी एकत्र येऊन हा ऐतिहासिक समागम कार्यक्रम साजरा केला.

श्री हुजूर साहिब नांदेड

शीखांचे दहावे गुरू श्री गोविंद साहिबजी यांची कर्मभूमी ही महाराष्ट्रातील श्री हुजूर साहिब नांदेड असून याठिकाणी त्यांनी सर्व शीख बांधवांना उद्देशून, 'सब सिक्खन को हुकम हे गुरू मान्यो ग्रंथ साहिब' असा उपदेश दिला होता. हा मानवतेचा संदेश घरोघरी पोचविण्यासाठी व श्री गुरु तेग बहादुर साहिब यांच्या त्यागाची शिकवण समाजाच्या सर्व घटकांत पोचविण्याच्या उद्देशाने नांदेड येथे येत्या २४ व २५ जानेवारीला शहिदी समागम कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येत आहे.

नांदेडमध्ये देहरुपी गुरु जाऊन गुरुग्रंथ साहिबची स्थापना झाली. नांदेड येथील बंदासिंग यांनी गुरु गोविंद सिंग यांच्या प्रेरणेने पंजाबात जाऊन परकियांशी लढा दिला व प्रशासक बनले. त्यांनी सरहिंद जिंकून शेतकऱ्यांना जमीन मालकीचा अधिकार दिला आणि स्वराज्याची पायाभरणी केली.

गुरू गोविंद सिंग यांनी १७०६ मध्ये ‘जफरनामा’ हे पत्र लिहून सत्ता प्रमुखाला नैतिकतेचे आव्हान दिले. हे पत्र फारसी भाषेत असून, त्यात सत्ताधिशांच्या विश्वासघातकी वर्तनाचा, जुलूमांचा आणि शीखांवर केलेल्या अत्याचारांचा समाचार घेतला. पत्र वाचून बादशाहने गुरूजींना सन्मानाने आणण्याचा आदेश दिला, पण गुरूजींनी ते नाकारले. हे पत्र शीख इतिहासातील विजयाचे प्रतीक मानले जाते.

मराठवाडयातील नरसी नामदेव हे थोर वारकरी संत, संत नामदेवांचे जन्म गावही याच भागात आहे. संत नामदेवांनी वारकरी संप्रदायाच्या विस्ताराकरिता देशभ्रमण केले. पंजाबात गेले असता त्यांच्या उद्बोधनाने सर्व समाज भारावला त्यांच्या ६१ अभंगांचा शिखांच्या पवित्र गुरु ग्रंथसाहिबमध्ये अंतर्भाव करण्यात आला आहे.

श्री गुरु तेग बहादुर साहिब यांचा देशरक्षण, सहिष्णुता आणि मानवतेचा संदेश महाराष्ट्रातील घराघरांत पोहचविण्याच्या उद्देशाने महाराष्ट्र शासन तसेच शीख, सिकलीगर, बंजारा, लबाना, मोह्याल, वाल्मिकी उदासीन आणि गुरुनानक नामदेव संगत, तखत नांदेड गुरुसाहेब यांचा समावेश असलेल्या श्री गुरु तेग बहादुर साहिबजी ३५० वी शहिदी समागम राज्यस्तरीय समितीमार्फत नांदेड येथे २४ व २५ जानेवारी २०२६ रोजी शहिदी समागम कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. पंजाब, आंध्रप्रदेश, कर्नाटक, तेलंगना आणि मराठवाडयातील शीख व अन्य समाज बांधव मोठया संख्येने यात सहभागी होणार आहेत. गुरु तेगबहादुरांच्या कार्याची महिती पोचविण्यासाठी प्रत्येक शाळा,महाविद्यालये, विद्यापीठांमध्ये वक्तृत्व स्पर्धा, गीते, डाक्युमेंटरी प्रदर्शीत करण्यात येत आहेत. या सर्व आयोजनातून ‘हिंद दी चादर’श्री गुरु तेग बहादुर साहिबजी यांचे महान विचार आणि अजोड कर्तृत्वाचा परिचय जनतेला होणार आहे.

रितेश मो.भुयार, माहिती अधिकारी, माहिती व जनसंपर्क, नागपूर.

---------------

हिंदुस्थान समाचार / हर्षदा गावकर


 rajesh pande