

मुंबई, 17 जानेवारी (हिं.स.)। टेक्नोने आपला नवीन एंट्री-लेव्हल स्मार्टफोन टेक्नो स्पार्क गो 3 भारतात अधिकृतपणे लाँच केला आहे. हा फोन टेक्नो स्पार्क गो 2 चा उत्तराधिकारी असून, भारतीय बाजारातील बजेट ग्राहकांसाठी टिकाऊ, वैशिष्ट्यपूर्ण आणि परवडणारा पर्याय म्हणून सादर करण्यात आला आहे. कमी किंमतीत उत्तम टिकाऊपणा, नाविन्यपूर्ण ऑफलाइन कॉलिंग सुविधा आणि दीर्घकाळ चालणाऱ्या परफॉर्मन्समुळे हा फोन लक्ष वेधून घेत आहे.
लाँचप्रसंगी टेक्नो मोबाईल इंडियाचे सीईओ अरिजीत तलापात्रा म्हणाले की, भारतीय तरुण ग्राहकांना त्यांच्या दैनंदिन गतीशी जुळणारे स्मार्टफोन हवेत. स्पार्क गो 3 सह कंपनीने सामर्थ्य, बुद्धिमत्ता आणि विश्वसनीय कनेक्टिव्हिटी यांचा संगम असलेले उपकरण सादर केले आहे. ‘देश जैसा दमदार’ या ब्रँड तत्त्वज्ञानानुसार या फोनची रचना दैनंदिन वापरातील अनिश्चितता लक्षात घेऊन करण्यात आली असून, सौंदर्यापेक्षा बिल्ड क्वालिटी आणि स्थानिक वैशिष्ट्यांवर अधिक भर देण्यात आला आहे.
टिकाऊपणाच्या दृष्टीने टेक्नो स्पार्क गो 3 ला IP64 रेटिंग देण्यात आले आहे, ज्यामुळे तो धूळ आणि पाण्याच्या शिंतोड्यांपासून सुरक्षित राहतो. कंपनीच्या दाव्यानुसार, हा फोन 1.2 मीटर उंचीवरून पडल्यासही सुरक्षित राहू शकतो, त्यामुळे दैनंदिन वापरात अपघात होण्याची शक्यता असणाऱ्या ग्राहकांसाठी तो उपयुक्त ठरेल.
या फोनचे सर्वात आकर्षक वैशिष्ट्य म्हणजे FreeLink 2.0 ही ऑफलाइन कॉलिंग सुविधा आहे. नेटवर्क किंवा इंटरनेट कनेक्शन नसतानाही दोन टेक्नो फोनधारक 1.5 किलोमीटरपर्यंतच्या अंतरात एकमेकांना कॉल करू शकतात. ग्रामीण भागात किंवा नेटवर्क कमकुवत असलेल्या ठिकाणी ही सुविधा विशेष फायदेशीर ठरेल.
टेक्नोने दावा केला आहे की, स्पार्क गो 3 चार वर्षांपर्यंत लॅग-फ्री परफॉर्मन्स देईल. यासाठी यात Unisoc T7250 चिपसेट देण्यात आला आहे, जो एंट्री-लेव्हल सेगमेंटमध्ये दीर्घकाळ स्थिर कामगिरी देणारा ठरू शकतो. डिस्प्लेबाबत, या फोनमध्ये 6.75 इंचाचा HD+ स्क्रीन असून 120Hz रिफ्रेश रेटमुळे स्क्रोलिंग आणि व्हिडीओ पाहताना स्मूथ अनुभव मिळतो. बॅटरीसाठी 5,000mAh क्षमतेची बॅटरी आणि 15W वायर्ड फास्ट चार्जिंग सपोर्ट देण्यात आला आहे, ज्यामुळे दिवसभराचा वापर सहज शक्य होईल. सॉफ्टवेअरच्या बाबतीत, हा फोन Android 15 (Go edition) वर चालतो आणि त्यावर HiOS 13 स्किन देण्यात आले आहे. यामध्ये Ella AI व्हॉइस असिस्टंटचा समावेश असून तो हिंदी, मराठी, तमिळ, तेलुगू, गुजराती आदी अनेक भारतीय भाषांना सपोर्ट करतो, त्यामुळे स्थानिक भाषिक ग्राहकांना अधिक सोयीस्कर अनुभव मिळेल.
टेक्नो स्पार्क गो 3 चा 4GB रॅम आणि 64GB स्टोरेज असलेला व्हेरिएंट 8,999 रुपयांना उपलब्ध असून, 23 जानेवारीपासून हा फोन भारतातील प्रमुख रिटेल स्टोअर्स आणि ॲमेझॉनवर खरेदीसाठी उपलब्ध होईल. टायटॅनियम ग्रे, इंक ब्लॅक, गॅलेक्सी ब्लू आणि ऑरोरा पर्पल या चार रंगांमध्ये उपलब्ध असलेला हा फोन बजेट सेगमेंटमध्ये स्पर्धा वाढवेल आणि ग्रामीण तसेच शहरी दोन्ही ग्राहकांना आकर्षित करेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Suraj Chaugule