
मुंबई, 17 जानेवारी (हिं.स.)अजिंक्य रहाणे सध्या देशांतर्गत हंगामात मुंबईकडून खेळत आहे. रहाणे हा मुंबई संघाचा एक महत्त्वाचा सदस्य आहे आणि संघातील सर्वात वरिष्ठ क्रिकेटपटूंपैकी एक मानला जातो. पण रहाणेने अचानक मुंबईकडून रणजी ट्रॉफी खेळण्यापासून माघार घेतली आहे.
रहाणे मुंबईकडून उर्वरित सामने खेळणार नाही. त्याने वैयक्तिक कारणांमुळे हा निर्णय घेतला आहे. रणजी ट्रॉफी आता दोन भागात खेळवली जाते. या देशांतर्गत स्पर्धेचा दुसरा भाग काही दिवसांत सुरू होणार आहे. या अर्ध्या भागातील मुंबईचा पहिला सामना २२ ते २५ जानेवारी दरम्यान हैदराबादविरुद्ध आहे.रहाणेचा सध्याचा रणजी ट्रॉफी हंगाम विशेष प्रभावी राहिला नाही. त्याने त्याच्या चार रणजी ट्रॉफी सामन्यांपैकी फक्त एका सामन्यात शतक झळकावले आहे. या हंगामापूर्वी रहाणेने मुंबईचे कर्णधारपदही नाकारले होते. तरुण क्रिकेटपटूंना संधी देण्याची इच्छा त्याने व्यक्त केली. त्याच्या जागी शार्दुल ठाकूरकडे मुंबईच्या संघाच्या कर्णधारपदाची धुरा सोपविण्यात आली होती.
रहाणेच्या नेतृत्वाखाली, मुंबईने २०२३-२४ रणजी ट्रॉफीचे जेतेपद जिंकले आणि सात वर्षांचा दुष्काळ संपवला. त्याच्या नेतृत्वाखाली मुंबईने २०२४-२५ मध्ये इराणी कपही जिंकला. रहाणेने भारताचेही नेतृत्व केले आहे. २०२१ च्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यादरम्यान, जेव्हा कोहलीने मुलाच्या जन्मामुळे पहिल्या सामन्यातून माघार घेतली, तेव्हा रहाणेने संघाचे नेतृत्व केले. तो दुखापतग्रस्त संघाचा प्रभारी होता, ज्यामध्ये वरिष्ठ क्रिकेटपटूंची जागा तरुण क्रिकेटपटूंनी घेतली होती. पहिल्या कसोटीत भारताचा दारुण पराभव झाला असला तरी, रहाणेने आपल्या नेतृत्वाखील ऑस्ट्रेलियाला त्यांच्याच भूमित पराभूत करण्याची किमया साधली होती.
---------------
हिंदुस्थान समाचार / वृषाली देशपांडे