
नवी दिल्ली, 18 जानेवारी (हिं.स.)टाटा स्टील मास्टर्स बुद्धिबळ स्पर्धेत अव्वल मानांकित अर्जुन एरिगेसीने आर. प्रज्ञानंदाचा पराभव करून आपल्या मोहिमेची जोरदार सुरुवात केली. तर विश्वविजेता डी. गुकेशने पहिल्या फेरीत उझबेकिस्तानच्या विश्वचषक विजेत्या झावोखिर सिंदारोव्हविरुद्ध चुरशीची बरोबरी साधली.
प्रज्ञानंद विरुद्ध एरिगेसीने सुरुवातीपासूनच चांगली कामगिरी केली. प्रज्ञानंद ने सुरुवातीलाच चूक केली, त्याने त्याच्या राजाला मध्यभागी अडकवले, ज्याचा फायदा एरिगेसीने फक्त 32 चालींमध्ये घेतला आणि सामना जिंकला. गुकेश देखील विजयाच्या जवळ पोहोचला पण पांढऱ्या मोहऱ्यांसह खेळत सिंदारोव्ह विरुद्ध त्याच्या मजबूत स्थितीचे विजयात रूपांतर करू शकला नाही. हा दिवसातील सर्वात लांब सामना होता, 78 चालींनंतर तो अनिर्णित राहिला. स्पर्धेत सहभागी असलेला आणखी एक भारतीय बुद्धिबळपटू अरविंद चिदंबरमनेही जर्मनीच्या मॅथियास ब्लूबॉम विरुद्ध बरोबरीने सुरुवात केली. इतर सामन्यांमध्ये, तुर्कीचा यागिझ कान एर्डोगमसने उझबेकिस्तानच्या नोदिरबेक याकुबोएव्हशी बरोबरी साधली, तर नेदरलँड्सचा जॉर्डन व्हॅन फॉरेस्टने चेक रिपब्लिकच्या थाई दाई व्हॅन गुयेनशी बरोबरी साधली.
स्पर्धेतील पहिला विजय अमेरिकेच्या हान्स मोके निमनने मिळवला, ज्याने स्लोव्हेनियाच्या व्लादिमीर फेडोसेव्हला पराभूत केले. जर्मन खेळाडू विन्सेंट कीमर दिवसाचा दुसरा विजेता होता, त्याने डच स्टार अनिश गिरीला हरवले. पहिल्या फेरीनंतर, एरिगेसी, कीमर आणि निमन प्रत्येकी एका गुणाने बरोबरीत आहेत. तर गुकेश आणि इतर सात बुद्धिबळपटू त्यांच्यापेक्षा अर्धा गुण मागे आहेत.
---------------
हिंदुस्थान समाचार / वृषाली देशपांडे