
न्यूझीलंडने एकदिवसीय मालिका 2-1 ने जिंकली
इंदूर, 18 जानेवारी (हिं.स.)भारसीयत आणि न्यूझीलंडमधील तीन सामन्यांच्या वनडे मालिकेतील तिसरा सामना रविवारी इंदूर येथे खेळला गेला. न्यूझीलंडने ४१ धावांनी या सामन्यात विजय मिळवला. या विजयासह पाहुण्या संघाने तीन सामन्यांची वनडे मालिका २-१ ने जिंकली. इंदूरमध्ये नाणेफेक गमावल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना किवी संघाने ५० षटकांत 8 विकेट्स गमावून ३३७ धावा केल्या. लक्ष्याचा पाठलाग करताना भारतीय संघ ४६ षटकांत केवळ २९६ धावाच करू शकला. आणि शुभमन गिलच्या संघाला ४१ धावांनी पराभव पत्करावा लागला.
लक्ष्याचा पाठलाग करताना भारतीय संघ निश्चितच विजयापासून दूर राहिला. पण विराट कोहलीची कामगिरी उत्कृष्ट होती. चौथ्या क्रमांकावर फलंदाजी करताना त्याने १०८ चेंडूंचा सामना केला आणि ११४.८१ च्या स्ट्राईक रेटने १२४ धावा करण्यात यश मिळवले. त्याने एकदिवसीय क्रिकेटमधील आपले 54 वे आणि आंतरराष्ट्रीय कारकीर्दीतील 85 वे शतक झळकावले. त्याच्या या खेळीत 10 चौकार आणि तीन षटकारांचा समावेश होता. नितीश कुमार रेड्डी यांनी ५७ चेंडूत ५३ धावा आणि हर्षित राणा यांनी ४३ चेंडूत ५२ धावा केल्या. तरीही संघ जिंकू शकला नाही.
तत्पूर्वी, डॅरेल मिशेल आणि ग्लेन फिलिप्स यांच्या शतकांमुळे, इंदूरच्या होळकर स्टेडियमवर झालेल्या मालिकेतील तिसऱ्या आणि निर्णायक सामन्यात न्यूझीलंडने प्रथम फलंदाजी करताना ३३७ धावा केल्या आणि भारतासमोर विजयासाठी ३३८ धावांचे लक्ष्य ठेवले. अर्शदीप आणि हर्षित यांनी न्यूझीलंडच्या दोन्ही सलामीवीरांना ५ धावांवर बाद करून भारताला चांगली सुरुवात दिली. तथापि, विल यंग आणि डॅरेल मिशेल यांनी तिसऱ्या विकेटसाठी अर्धशतकी भागीदारी करून डावाला पुनरुज्जीवित करण्याचा प्रयत्न केला. पण हर्षितने ही भागीदारी मोडित कढाली.
यानंतर, डॅरेल मिशेल आणि ग्लेन फिलिप्स यांनी डावाची सूत्रे हाती घेतली. दोघांनीही मैदानावर धावा केल्या. ही भागीदारी कशी मोडायची याबद्दल भारतीय गोलंदाज गोंधळलेले होते. डॅरेल मिशेलनंतर, ग्लेन फिलिप्सने शतक ठोकले. मिशेलचे हे सलग दुसरे शतक होते, तर फिलिप्सचे भारताविरुद्ध पहिले शतक होते. दोघांनी १८६ चेंडूत चौथ्या विकेटसाठी २१९ धावांची भागीदारी केली आणि ३०० पेक्षा जास्त धावसंख्येचा पाया रचला.
अर्शदीपने ही भागीदारी मोडली आणि फिलिप्सला बाद केले. फिलिप्सने ८८ चेंडूत ९ चौकार आणि ३ षटकारांसह १०६ धावा केल्या. त्यानंतर सिराजने डॅरिल मिचेलला बाद केले. ज्याने १३१ चेंडूत १५ चौकार आणि ३ षटकारांसह १३७ धावा केल्या.
---------------
हिंदुस्थान समाचार / वृषाली देशपांडे