
रायगड, 18 जानेवारी (हिं.स.)। पुण्याच्या जवळ असलेले, पर्यटकांचे नंदनवन म्हणून ओळखले जाणारे माथेरान सध्या गुन्हेगारांचे सुरक्षित ठिकाण बनत चालल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे. शुक्रवारी रात्री चाकूच्या धाकाने झालेल्या थरारक जबरी चोरीने संपूर्ण शहर हादरले असून, व्यापारी व पर्यटकांमध्ये तीव्र भीतीचे वातावरण पसरले आहे.
माथेरान पोलीस ठाणे हद्दीतील छत्रपती शिवाजी रोड परिसरात असलेल्या वन टू हिल पॉईंटजवळील कदमटी स्टॉल येथे १६ जानेवारी रोजी रात्री ही धाडसी घटना घडली. “सिगारेट पाहिजे” या बहाण्याने दुकानात प्रवेश करत एका चोरट्याच्या पाठोपाठ आणखी तीन अज्ञात इसमांनी थेट घरात घुसखोरी केली. क्षणातच चोरट्यांनी चाकू दाखवत दुकानदार नारायण मारुती कदम व त्यांच्या पत्नीला जीवे मारण्याची धमकी दिली.
यानंतर दांपत्याचे हातपाय दोराने बांधून ठेवत घरात बेदरकारपणे शोधाशोध करण्यात आली. चोरट्यांनी सुमारे एक लाख रुपये रोख रक्कम तसेच सात ते आठ तोळे सोन्याचे दागिने असा ४ लाख ३१ हजार ९०० रुपयांचा ऐवज लंपास करून थेट पलायन केले. दुकान व घर एकाच ठिकाणी असल्याने या घटनेने संपूर्ण परिसर हादरून गेला. अचानक घडलेल्या या प्रकारामुळे व्यापारी दांपत्याला मोठा मानसिक धक्का बसला असून, रात्रीच्या वेळेस माथेरानमध्ये सुरक्षितता आहे का? असा सवाल उपस्थित झाला आहे. गावापासून दूर, एकाकी ठिकाणी असलेले बंगले, दुकाने आणि पर्यटन पॉईंट्स गुन्हेगारांसाठी सॉफ्ट टार्गेट ठरत असल्याची संतप्त चर्चा नागरिकांत सुरू आहे.
या प्रकरणी माथेरान पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक ०१/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहिता कलम ३०९(४), ३३१(४) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून, सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री. अनिल सोनोने अधिक तपास करीत आहेत. पर्यटनावर अवलंबून असलेल्या माथेरानमध्ये वाढती गुन्हेगारी ही धोक्याची घंटा ठरत असून, पोलीस गस्त, रात्रीचा बंदोबस्त आणि सीसीटीव्ही यंत्रणा तातडीने वाढवण्याची जोरदार मागणी व्यापारी व स्थानिक नागरिकांकडून होत आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / संदेश साळुंके