
जळगाव, 19 जानेवारी (हिं.स.)भुसावळ तालुक्यातील किन्ही शिरपूर एमआयडीसी परिसरात असलेल्या ‘नमो एनर्जी ऑईल’ कंपनीच्या गोदामात सुरू असलेल्या संशयास्पद इंधन साठवणुकीची गुप्त माहिती मिळाल्यानंतर भुसावळ तालुका पोलीस व पुरवठा विभागाने संयुक्त कारवाई करत तब्बल ३० हजार लिटर डिझेलसदृश ज्वलनशील पदार्थ जप्त केला. या कारवाईत सुमारे ३६ लाख रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला असून जिल्ह्यातील भेसळखोर व ऑईल माफियांमध्ये खळबळ उडाली आहे. तहसीलदारांच्या आदेशान्वये पुरवठा निरीक्षण अधिकारी रोशना रेवतकर, पोलीस उपनिरीक्षक पूजा अंधारे व त्यांच्या पथकाने पंचासमक्ष कंपनीच्या आवारात धाड टाकली. एमआयडीसीतील प्लॉट क्रमांक F-50/51 येथे उभा असलेला GJ-24-V-7655 क्रमांकाचा टँकर तपासण्यात आला असता त्यात डिझेलसारखा उग्र वास असलेला ज्वलनशील द्रव आढळून आला. घटनास्थळी कंपनी मालकाचा भाऊ अमीन इक्बाल तेली (रा. सूरत) यांची चौकशी करण्यात आली. मात्र त्यांनी समाधानकारक माहिती न दिल्याने संशय बळावला. अधिकाऱ्यांनी टँकरमधील इंधनाची घनता व तापमान मोजणी केली. हा पदार्थ बायोडिझेल आहे की भेसळयुक्त डिझेल, याची खात्री करण्यासाठी नमुने सीलबंद करून प्रयोगशाळेत पाठवण्यात आले आहेत. या कारवाईत १५ लाख रुपये किमतीचा टँकर आणि २१ लाख रुपये किमतीचे ३० हजार लिटर इंधन (प्रति लिटर अंदाजे ७० रुपये दराने) असा एकूण ३६ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. सुरक्षिततेच्या कारणास्तव टँकर भुसावळ तालुका पोलीस ठाण्यात हलवण्यात आला आहे. प्राथमिक तपासात या इंधन साठवणुकीचा थेट संबंध गुजरात राज्याशी असल्याचे संकेत मिळाले असून पुढील तपास सुरू आहे. या धडक कारवाईमुळे जिल्ह्यातील अवैध इंधन व्यापार्यांमध्ये कायदेशीर कारवाईची धास्ती निर्माण झाली आहे. या यशस्वी कारवाईत शिर्डी उपनिरीक्षक रवी नरवडे, हवालदार उमाकांत पाटील, गोपाळ गव्हाणे, रतन परदेशी, विकास सातदिवे, राहुल वानखेडे यांच्यासह तालुका पोलीस ठाण्याचे पथक सहभागी होते.
---------------
हिंदुस्थान समाचार / मनोहर कांडेकर