
परभणी, 19 जानेवारी (हिं.स.)।
गंगाखेड येथील सह दिवाणी न्यायालयात सुनावणीदरम्यान न्यायालयीन शिस्तभंग करणारा गंभीर प्रकार घडला आहे. न्यायालयाचे कामकाज जाणीवपूर्वक बंद पाडण्याचा तसेच थेट न्यायाधीशांवर हल्ला करण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी एका इसमाविरुद्ध गंगाखेड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत न्यायालयातील वरिष्ठ लिपीक श्रीमती राही अश्रोबा फपाळ (वय 46, रा. प्राध्यापक कॉलनी, गंगाखेड) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, सह दिवाणी न्यायालयात नियमित फौजदारी खटला क्र. 230/2012 (राज्य विरुद्ध बाबुराव सावंत व इतर) या प्रकरणाची सुनावणी सुरू होती. यावेळी साक्षीदाराची सरतपासणी चालू असताना एक इसम अचानक कोर्ट हॉलमध्ये शिरला. सदर इसमाने माझ्या केसचा निकाल माझ्या विरोधात का दिला? असे म्हणत जोरजोरात आरडाओरड सुरू केली. न्यायालयाचे कामकाज ठप्प करण्याच्या उद्देशाने त्याने गोंधळ घातल्याने उपस्थित विधीज्ञ, सरकारी वकील व न्यायालयीन कर्मचार्यांनी त्यास ताब्यात घेऊन कोर्ट हॉलच्या बाहेर काढले. मात्र, बाहेर गेल्यानंतरही तो इसम धमक्या देत आरडाओरड करत राहिला. काही वेळातच तो पुन्हा कोर्ट हॉलमध्ये शिरून न्यायाधीशांकडे धाव घेत मारहाण करण्याच्या उद्देशाने डायसच्या पायर्या चढू लागला. यावेळी उपस्थित विधीज्ञांनी प्रसंगावधान राखत त्यास रोखून पोलिसांच्या ताब्यात दिले.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संबंधित इसमाचे नाव राम महादेव फड (वय 25, रा. हळंब, ता. परळी, जि. बीड) असे आहे. या प्रकरणी गंगाखेड पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला असून, पोलीस निरीक्षक श्रीकांत डोंगरे पुढील तपास करीत आहेत.
---------------
हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis