रायगड: मारकेवाडी गावात सापडला सडलेला मृतदेह
रायगड, 19 जानेवारी (हिं.स.) – कर्जत तालुक्यातील मारकेवाडी गावाच्या मागील नाल्यात सडलेल्या अवस्थेत अज्ञात व्यक्तीचा मृतदेह आढळल्याने संपूर्ण परिसर हादरून गेला आहे. नाल्यातून येणाऱ्या असह्य दुर्गंधीमुळे स्थानिकांनी परिसराची पाहणी केली असता हा धक्कादा
रायगड: मारकेवाडी गावात सापडला सडलेला मृतदेह


रायगड, 19 जानेवारी (हिं.स.) – कर्जत तालुक्यातील मारकेवाडी गावाच्या मागील नाल्यात सडलेल्या अवस्थेत अज्ञात व्यक्तीचा मृतदेह आढळल्याने संपूर्ण परिसर हादरून गेला आहे. नाल्यातून येणाऱ्या असह्य दुर्गंधीमुळे स्थानिकांनी परिसराची पाहणी केली असता हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला.

प्राथमिक तपासानुसार, मृतदेह तीन ते चार दिवसांपासून नाल्यात पडलेला असल्याचा अंदाज आहे. मृत व्यक्तीची ओळख, वय तसेच मृत्यूचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. शरीर पूर्णपणे कुजलेल्या अवस्थेत असल्याने ओळख पटवणे पोलिसांसमोर मोठे आव्हान ठरले आहे.घटनेची माहिती मिळताच कर्जत पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले. परिसर सील करून घटनास्थळाचा सखोल पंचनामा करण्यात आला. मृतदेह कर्जत उपजिल्हा रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला असून, अहवालानंतरच हा मृत्यू हत्या आहे की अपघात, की मृतदेह मुद्दाम नाल्यात फेकण्यात आला, याचा खुलासा होणार आहे.

पोलिसांनी परिसरातील बेपत्ता व्यक्तींच्या नोंदी तपासण्यास सुरुवात केली असून, संशयास्पद हालचाली, सीसीटीव्ही फुटेज आणि मोबाईल लोकेशनच्या आधारे तपास वेगाने सुरू आहे. गंभीर गुन्ह्याशी संबंधित असण्याची शक्यता वर्तवली जात असल्याने तपास अधिक तीव्र करण्यात आला आहे.या घटनेमुळे मारकेवाडी परिसरात दहशतीचे वातावरण निर्माण झाले असून, नागरिकांमध्ये भीती आणि अस्वस्थता पसरली आहे. मात्र पोलिसांनी नागरिकांना अफवांवर विश्वास न ठेवता सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे.

पोलीस निरीक्षक उमेश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक तौसिफ सय्यद, पोलीस हवालदार संतोष खाडे व अनिल वडते तसेच पोलीस कॉन्स्टेबल अमोल निर्मल व राहुल राठोड या प्रकरणाचा तपास करत आहेत. पोलिसांचा विश्वास आहे की लवकरच या रहस्यमय मृत्यूचा उलगडा होऊ शकेल

-------------------------

हिंदुस्थान समाचार / संदेश साळुंके


 rajesh pande