शिवसेनेचे माजी आमदार शिरीष चौधरी यांना अटक
नंदुरबार, 19 जानेवारी (हिं.स.) राजकारणात मोठी खळबळ उडवणारी घटना समोर आली आहे. अमळनेर येथील शिवसेना (शिंदे गट) चे माजी आमदार शिरीष चौधरी यांना दरोडा आणि ॲट्रोसिटी (अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायदा) अंतर्गत दाखल गुन्ह्यात नंदुरबार पोलिसां
शिवसेनेचे माजी आमदार शिरीष चौधरी यांना अटक


नंदुरबार, 19 जानेवारी (हिं.स.) राजकारणात मोठी खळबळ उडवणारी घटना समोर आली आहे. अमळनेर येथील शिवसेना (शिंदे गट) चे माजी आमदार शिरीष चौधरी यांना दरोडा आणि ॲट्रोसिटी (अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायदा) अंतर्गत दाखल गुन्ह्यात नंदुरबार पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

नंदुरबार नगरपालिकेच्या अलीकडेच पार पडलेल्या निवडणुकांनंतर ही संपूर्ण घटना घडली. माजी आमदार शिरीष चौधरी यांचे पुत्र प्रथमेश चौधरी यांची उपनगराध्यक्षपदी निवड झाली. या विजयानंतर काढण्यात आलेल्या विजय मिरवणुकीदरम्यान दोन गटांमध्ये जोरदार वाद उफाळून आला. सुरुवातीला शाब्दिक चकमकीपासून सुरू झालेला वाद काही वेळातच हाणामारीत रूपांतरित झाला. या तणावपूर्ण वातावरणात शहरात मोठा गोंधळ उडाला आणि कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला. त्याच रात्री संतप्त जमावाकडून माजी आमदार शिरीष चौधरी यांच्या घराची तोडफोड करण्यात आली. घरावर दगडफेक, वाहनांची मोडतोड आणि परिसरात तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत परिस्थिती नियंत्रणात आणली. मात्र तोपर्यंत दोन्ही बाजूंनी एकमेकांविरोधात गंभीर आरोप-प्रत्यारोप सुरू झाले होते. या प्रकरणात दोन्ही गटांकडून परस्परविरोधी तक्रारी पोलिस ठाण्यात दाखल करण्यात आल्या. चौधरी समर्थकांनी घरावर झालेल्या हल्ल्याबाबत तक्रार दिली, तर दुसरीकडे विरोधी गटाच्या तक्रारीवरून शिरीष चौधरी यांच्यावर दरोडा तसेच ॲट्रोसिटी कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला. तक्रारीनुसार, जातीय शिवीगाळ, धमकी आणि आर्थिक व्यवहारांशी संबंधित गंभीर आरोप करण्यात आले आहेत.

तपासादरम्यान प्राथमिक पुरावे आणि तक्रारींच्या आधारे नंदुरबार पोलिसांनी आज रविवारी माजी आमदार शिरीष चौधरी यांना ताब्यात घेतले. पोलिसांकडून त्यांची चौकशी सुरू असून, पुढील कायदेशीर प्रक्रिया राबवली जात आहे. विशेष म्हणजे, चौधरी यांच्या फिर्यादीवरून दाखल झालेल्या गुन्ह्यातील काही आरोपींनाही पोलिसांनी अटक केली आहे. त्यामुळे या प्रकरणात पोलिसांकडून दोन्ही बाजूंवर कारवाई होत असल्याचे चित्र आहे. शिरीष चौधरी यांच्या अटकेमुळे राजकीय वातावरण तापले आहे. शिवसेना (शिंदे गट) साठी ही घटना मोठा धक्का मानली जात असून, विरोधी पक्षांकडून या प्रकरणाचा जोरदार राजकीय फायदा घेण्याचे प्रयत्न सुरू झाले आहेत. स्थानिक पातळीवरही या घटनेचे पडसाद उमटत आहेत. अमळनेरचे अजित पवार गटाचे आमदार अनिल पाटील यांनी माजी आमदार शिरीष चौधरी आणि त्यांच्या कुटुंबावर गंभीर आरोप केले आहेत. चौधरी कुटुंबाची गुन्हेगारी पार्श्वभूमी असून हे कुटुंब सर्वसामान्य नागरिकांना धमकावत आहे, असा आरोप त्यांनी केला.

---------------

हिंदुस्थान समाचार / मनोहर कांडेकर


 rajesh pande