
सैंटियागो, 19 जानेवारी (हिं.स.)।चिलीच्या दक्षिण भागातील जंगलात रविवारी भीषण आग लागल्याची घटना घडली.या घटनेत आतापर्यंत किमान 18 जणांचा मृत्यू झाला असून आग अजूनही अनियंत्रितपणे पसरत आहे. प्रचंड उष्णता आणि जोरदार वाऱ्यांमुळे अग्निशमन दलासाठी आगीवर नियंत्रण मिळवणे अत्यंत कठीण झाले आहे. हजारो लोकांना आपली घरे सोडून पळ काढावा लागला असून मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त केली जात असून मदत व बचावकार्य पूर्ण ताकदीने सुरू आहे.
राष्ट्राध्यक्ष गेब्रिएल बोरिक यांनी नुबल आणि बायोबायो या भागांत आपत्कालीन स्थिती जाहीर केली आहे. राष्ट्राध्यक्ष गेब्रिएल बोरिक यांनी एक्सवर पोस्ट करत म्हटले आहे, “गंभीर आगीची परिस्थिती लक्षात घेता मी नुबल आणि बायोबायो भागांत आपत्कालीन स्थिती जाहीर केली आहे. सर्व आवश्यक संसाधने उपलब्ध करून दिली जात आहेत.”
चिलीची वनविभागीय संस्था सीओएनएएफच्या माहितीनुसार, रविवारी सकाळपर्यंत देशभरात 24 सक्रिय आगी होत्या. त्यापैकी सर्वाधिक धोकादायक आगी नुबल आणि बायोबायो भागांत लागल्या आहेत. हे दोन्ही भाग राजधानी सॅंटियागोपासून सुमारे 500 किलोमीटर दक्षिणेला आहेत. या दोन भागांमध्ये आगीमुळे आतापर्यंत सुमारे 8,500 हेक्टर (सुमारे 21,000 एकर) क्षेत्र जळून खाक झाले आहे. आगीमुळे 20,000 हून अधिक लोकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आले आहे. काही अहवालांनुसार ही संख्या 50,000 पर्यंत पोहोचू शकते. सेनाप्रेड (आपत्ती व्यवस्थापन संस्था) ने सांगितले की किमान 250 घरे पूर्णपणे जळून नष्ट झाली आहेत.
अनेक ठिकाणी लोक आपल्या पाळीव प्राण्यांना आणि आवश्यक वस्तूंना वाचवण्यासाठी धडपड करत आहेत. महापौरांसोबत झालेल्या बैठकीनंतर राष्ट्राध्यक्ष बोरिक यांनी संध्याकाळी मृतांच्या आकड्याची पुष्टी करताना सांगितले की हा आकडा आणखी वाढू शकतो, कारण अजूनही अनेक लोक बेपत्ता आहेत.
हवामानामुळे आगीचे स्वरूप अधिकच भयंकर झाले आहे. रविवारी आणि सोमवारी सॅंटियागोपासून बायोबायोपर्यंत तापमान 38 अंश सेल्सिअस (100 अंश फॅरेनहाइट) पर्यंत पोहोचण्याचा इशारा देण्यात आला आहे. जोरदार वाऱ्यांमुळे आग झपाट्याने पसरत आहे. देशाच्या मोठ्या भागात तीव्र उष्णतेचा (एक्स्ट्रीम हीट) इशारा जारी करण्यात आला आहे. आगीमुळे निर्माण झालेला धूर इतका दाट आहे की दूरवर काहीही दिसत नाही. अग्निशमन दलाचे जवान दिवसरात्र आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी झटत आहेत.
या वर्षाच्या सुरुवातीपासूनच चिली आणि शेजारील अर्जेंटिनामध्ये सतत उष्णतेच्या लाटा (हीटवेव्ह) येत आहेत. काही दिवसांपूर्वी अर्जेंटिनाच्या पॅटागोनिया भागातही मोठ्या प्रमाणावर जंगलआग लागली होती. आता चिलीमध्ये हे संकट आणखी गंभीर बनले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode