
कोनसीमा, 05 जानेवारी (हिं.स.) आंध्रप्रदेशच्या कोनसीमा जिल्ह्यात ओएनजीसीच्या एका तेल विहिरीतून सोमवारी मोठ्या प्रमाणावर वायू गळती झाल्याची गंभीर घटना समोर आली आहे. दुरुस्तीच्या कामादरम्यान झालेल्या जोरदार स्फोटानंतर कच्च्या तेलासोबत वायू हवेत उंचपर्यंत पसरला, ज्यामुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. या घटनेनंतर संपूर्ण परिसरात हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे.
आंध्रप्रदेशच्या राजोल तालुक्यातील इरुसुमंडा गावात ही घटना घडली. काही काळ उत्पादन थांबवून वर्कओव्हर रिगच्या मदतीने दुरुस्तीचे काम सुरू असताना अचानक स्फोट झाला. त्यानंतर वायू आणि धुराचे मोठे ढग परिसरात पसरले, ज्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. स्थानिक प्रशासनाच्या माहितीनुसार, गळती झालेल्या वायूला तात्काळ आग लागली. सुरक्षिततेच्या दृष्टीने आजूबाजूची गावे रिकामी करण्यात आली असून नागरिकांना वीज वापरणे, विद्युत उपकरणे सुरू करणे आणि चूल पेटवण्यास मनाई करण्यात आली आहे. अनेक नागरिकांनी आपली घरे व जनावरे सुरक्षित ठिकाणी हलवली आहेत.ओएनजीसीचे तांत्रिक पथक घटनास्थळी तातडीने दाखल झाले असून गळती आटोक्यात आणण्याचे आणि आग विझवण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. परिस्थितीवर राज्य प्रशासनासह केंद्र सरकारही लक्ष ठेवून असून, राष्ट्रीय पातळीवरील सुरक्षा आणि पर्यावरणीय परिणामांचा आढावा घेतला जात आहे.नागरिकांच्या सुरक्षिततेस सर्वोच्च प्राधान्य देण्यात येत असून परिस्थिती पूर्णपणे नियंत्रणात आणण्यासाठी सर्व आवश्यक उपाययोजना केल्या जात असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे.------------------
हिंदुस्थान समाचार / मनीष कुलकर्णी