


पणजी, 05 जानेवारी (हिं.स.)। जहाजबांधणी आणि सागरी क्षमता विकासात आत्मनिर्भरता साधण्याच्या भारताच्या प्रयत्नात एक मोठे पाऊल टाकत, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी 'समुद्र प्रताप' हे जहाज 5, जानेवारी 2026 रोजी गोव्यात भारतीय तटरक्षक दलाच्या ताफ्यात समाविष्ट केले.
गोवा शिपयार्ड लिमिटेड (जीएसएल) बांधणी करत असलेल्या दोन प्रदूषण नियंत्रण जहाजांपैकी हे पहिले जहाज आहे. 60% पेक्षा जास्त स्वदेशी सामग्रीसह, समुद्र प्रताप हे भारतातील पहिले स्वदेशी रचना असलेले प्रदूषण नियंत्रण जहाज आहे आणि आयसीजीच्या ताफ्यातील आतापर्यंतचे सर्वात मोठे जहाज आहे. समुद्र प्रतापच्या समावेशामुळे प्रदूषण नियंत्रण, अग्निशमन, सागरी सुरक्षा आणि पर्यावरण संरक्षण या क्षेत्रातील आयसीजीची परिचालन क्षमता लक्षणीयरीत्या वाढेल. यामुळे भारताच्या विशाल सागरी क्षेत्रांमध्ये विस्तारित देखरेख आणि प्रतिसाद मोहिमा राबवण्याची क्षमता देखील अधिक बळकट होईल.
संरक्षण मंत्र्यांनी हे जहाज भारताच्या परिपक्व संरक्षण औद्योगिक परिसंस्थेचे एक मूर्त स्वरूप असल्याचे नमूद केले, ज्यामध्ये गुंतागुंतीच्या उत्पादन आव्हानांना प्रभावीपणे सामोरे जाण्याची क्षमता आहे. जहाजांमधील स्वदेशी सामग्रीचा वापर 90% पर्यंत वाढवण्यासाठी सातत्याने प्रयत्न केले जात असल्याचे ते म्हणाले.
“आयसीजीएस समुद्र प्रताप प्रदूषण नियंत्रणासाठी विशेषत्वाने तयार केले आहे, परंतु त्याची भूमिका केवळ एवढ्यापुरती मर्यादित नाही. यात एकाच प्लॅटफॉर्मवर विविध क्षमता एकत्रित केल्या असल्यामुळे हे जहाज किनारी गस्त घालण्यात आणि सागरी सुरक्षा मजबूत करण्यात प्रभावी ठरेल. सध्याच्या सागरी आव्हानांना तोंड देण्यासाठी लवचिकता आणि सज्जता वाढविण्यासाठी जीएसएलने अवलंबलेल्या आधुनिक दृष्टिकोनातून याची निर्मिती झाली आहे,” असे राजनाथ सिंह म्हणाले.
सागरी प्रदूषणापासून ते किनारी स्वच्छतेपर्यंत, शोध आणि बचाव कार्यापासून ते सागरी कायदा अंमलबजावणीपर्यंत बहुआयामी भूमिका बजावल्याबद्दल संरक्षणमंत्र्यांनी भारतीय तटरक्षक दलाचे कौतुक केले. तटरक्षक दल ज्या पद्धतीने आपली कर्तव्ये पार पाडत आहे, त्यातून देशाच्या शत्रूंना एक स्पष्ट संदेश गेला आहे की जर त्यांनी भारताच्या सागरी सीमांकडे वाकड्या नजरेने पाहिले किंवा कोणत्याही आगळीकीचा प्रयत्न केला तर त्यांना धाडसी आणि चोख प्रत्त्युत्तर दिले जाईल.
हे जहाज प्रगत प्रदूषण शोधक प्रणाली, समर्पित प्रदूषण प्रतिसाद नौका आणि आधुनिक अग्निशमन क्षमतांनी सुसज्ज आहे. त्यात हेलिकॉप्टर हँगर आणि विमान वाहतूक सहाय्य सुविधा देखील आहेत, ज्यामुळे त्याची पोहोच आणि परिणामकारकता लक्षणीयरीत्या वाढू शकते. राजनाथ सिंह यांनी विश्वास व्यक्त केला की या क्षमतांमुळे, हे जहाज खवळलेल्या समुद्रातील कठीण परिस्थितीतही स्थिरपणे कार्य करू शकेल , ज्याचा वास्तविक जीवनातील परिचालनात मोठा फायदा होईल.
सागरी पर्यावरण संरक्षण ही केवळ धोरणात्मक गरज नसून नैतिक जबाबदारी असल्याचे संरक्षण मंत्र्यांनी सांगितले. हवामान बदल आणि जागतिक तापमानवाढीच्या आव्हानांच्या पार्श्वभूमीवर तेलगळती नियंत्रण, अग्निशमन आणि बचाव कार्य या पातळीवर त्यांनी भारतीय तटरक्षक दलाचे कौतुक केले. या कामगिरीमुळे भारत प्रगत पर्यावरणीय प्रतिसाद क्षमता असलेल्या निवडक देशांच्या श्रेणीत सामील झाला आहे.
“ समुद्र प्रताप हे जहाज हे अद्ययावत आधुनिक यंत्रणांनी सज्ज आहे. त्यामुळे समुद्रात कुठेही प्रदूषण झाले तर ते लगेच ओळखता येईल, जहाज योग्य ठिकाणी स्थिर राहून काम करू शकेल आणि प्रदूषण पटकन दूर करता येईल. यामुळे प्रवाळभित्ती, खारपुटी, मासे आणि इतर सागरी जीव वाचतील. अशा प्रकारे किनाऱ्याजवळ राहणाऱ्या लोकांचे जीवन सुरक्षित राहील आणि समुद्रावर आधारित अर्थव्यवस्था म्हणजे नील अर्थव्यवस्था टिकून राहील.” असे त्यांनी सांगितले.
समुद्र प्रताप या जहाजाचा समावेश हा भारताच्या मोठ्या सागरी योजनेचा भाग आहे. समुद्रातील संपत्ती ही एका देशाची मालकी नसून संपूर्ण जगासाठीची सामायिक संपत्ती आहे. म्हणजेच समुद्र आणि त्यातील संसाधने सर्व मानवजातीची आहेत, त्यांचे रक्षण करणे ही सर्वांची जबाबदारी आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.
या जहाजावर प्रथमच दोन महिला अधिकारी नियुक्त झाल्या आहेत. “आज महिला केवळ सहाय्यक भूमिका बजावत नाहीत, तर राष्ट्रसेवेत अग्रभागी योद्ध्यांच्या भूमिकेत आहेत. समुद्र प्रताप वरील दोन महिला अधिकारी भावी पिढ्यांसाठी आदर्श आहेत,” असे त्यांनी नमूद केले.
तटरक्षक दलात सागरी कायद्याची अंमलबजावणी, पर्यावरणाचे संरक्षण आणि सागरी सायबर सुरक्षा यासारख्या विशेष करीअरच्या शाखा विकसित करणे गरजेचे आहे, असे ते म्हणाले.
या प्रसंगी गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, संरक्षण सचिव राजेश कुमार सिंह, तटरक्षक महासंचालक परमेश शिवमणी, गोवा शीपयार्ड लिमिटेडचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक ब्रजेश कुमार उपाध्याय तसेच केंद्र व राज्य सरकारचे अधिकारी उपस्थित होते.
आयसीजीएस समुद्र प्रताप विषयी
समुद्र प्रताप म्हणजे मॅजेस्टी ऑफ द सीज. हे जहाज सुरक्षित, संरक्षित आणि स्वच्छ समुद्र राखण्यासाठी तसेच राष्ट्राच्या सागरी हितसंपत्तीचे रक्षण करण्यासाठी भारतीय तटरक्षक दलाच्या दृढनिश्चयाचे प्रतीक आहे. याची लांबी 114.5 मिटर असून वेग 22 सागरी मैलापेक्षा अधिक आहे. जहाज अत्याधुनिक प्रणालींनी सज्ज आहे – साईड स्वीपिंग आर्म्स, तरंगते अडथळे (फ्लोटिंग बूम्स), उच्च क्षमतेचे तेल-गोळा करणारे यंत्र, पोर्टेबल नौका आणि प्रदूषण नियंत्रण प्रयोगशाळा यांचा समावेश आहे.
हे जहाज कोची येथे तैनात राहील आणि तटरक्षक दलाच्या पश्चिम विभागाचे प्रमुखांच्या नियंत्रणाखाली तटरक्षक जिल्हा मुख्यालय क्रमांक 4 (केरळ आणि माहे) यांच्या माध्यमातून कार्यरत राहील.
---------------
हिंदुस्थान समाचार / Suraj Chaugule