बीसीसीएलचा आयपीओ ९ जानेवारीला होणार खुला
मुंबई, 06 जानेवारी (हिं.स.)। भारत कोकिंग कोल लिमिटेड (बीसीसीएल)चा प्रारंभिक सार्वजनिक प्रस्ताव (आयपीओ) शुक्रवार, ९ जानेवारी २०२६ रोजी गुंतवणूकदारांसाठी खुला होणार आहे. कंपनीने प्रति १० रुपये दर्शनी मूल्याच्या इक्विटी शेअरसाठी २१ ते २३ रुपयांचा किंम
BCCL IPO


मुंबई, 06 जानेवारी (हिं.स.)। भारत कोकिंग कोल लिमिटेड (बीसीसीएल)चा प्रारंभिक सार्वजनिक प्रस्ताव (आयपीओ) शुक्रवार, ९ जानेवारी २०२६ रोजी गुंतवणूकदारांसाठी खुला होणार आहे. कंपनीने प्रति १० रुपये दर्शनी मूल्याच्या इक्विटी शेअरसाठी २१ ते २३ रुपयांचा किंमतपट्टा निश्चित केला आहे. हा आयपीओ मंगळवार, १३ जानेवारी २०२६ रोजी बंद होणार असून, किमान ६०० इक्विटी शेअर्सचा एक लॉट आणि त्यानंतर ६०० शेअर्सच्या पटीत बोली लावता येणार आहे. अँकर गुंतवणूकदारांसाठी बोली प्रक्रिया गुरुवार, ८ जानेवारी २०२६ रोजी होणार आहे.

बीसीसीएलने २ जानेवारी २०२६ रोजी आपला रेड हेरिंग प्रॉस्पेक्टस रांची येथील कंपनी रजिस्ट्रार, सेबी आणि संबंधित स्टॉक एक्सचेंजकडे दाखल केला होता. हा आयपीओ पूर्णपणे ऑफर फॉर सेल स्वरूपाचा असून, प्रवर्तक कोल इंडिया लिमिटेडकडून सुमारे ४६५.७ कोटी इक्विटी शेअर्सची विक्री केली जाणार आहे. या इश्यूमध्ये पात्र संस्थात्मक गुंतवणूकदारांसाठी ५० टक्क्यांपेक्षा जास्त हिस्सा राखीव ठेवण्यात आला असून, बिगर-संस्थात्मक गुंतवणूकदारांसाठी १५ टक्के आणि किरकोळ गुंतवणूकदारांसाठी ३५ टक्के हिस्सा राखीव आहे. याशिवाय, पात्र कर्मचाऱ्यांसाठी आणि पात्र भागधारकांसाठी स्वतंत्र आरक्षण कोटा देण्यात आला असून, कर्मचाऱ्यांना प्रति शेअर १ रुपयाची सवलत मिळणार आहे.

बीसीसीएल ही कोल इंडिया लिमिटेडची पूर्ण मालकीची उपकंपनी असून, तिला २०१४ मध्ये ‘मिनी रत्न’ दर्जा देण्यात आला आहे. आर्थिक वर्ष २०२५ मध्ये देशांतर्गत कोकिंग कोळसा उत्पादनापैकी सुमारे ५८.५० टक्के वाट्यासह ही भारतातील सर्वात मोठी कोकिंग कोळसा उत्पादक कंपनी ठरली आहे. कंपनीकडे १ एप्रिल २०२४ पर्यंत सुमारे ७,९१० दशलक्ष टन कोकिंग कोळशाचा अंदाजित साठा असून, ती देशातील सर्वात मोठ्या कोकिंग कोळसा साठा धारकांपैकी एक मानली जाते.

कंपनीचे मुख्य उत्पादन कोकिंग कोळसा असून, पोलाद आणि ऊर्जा उद्योगांच्या गरजांसाठी विविध दर्जाचा कोकिंग कोळसा, नॉन-कोकिंग कोळसा आणि धुतलेला कोळसा पुरवला जातो. गेल्या काही वर्षांत बीसीसीएलने आपल्या उत्पादन क्षमतेत मोठी वाढ केली असून, आर्थिक वर्ष २०२२ मधील ३०.५१ दशलक्ष टन उत्पादन आर्थिक वर्ष २०२५ मध्ये ४०.५० दशलक्ष टनांपर्यंत पोहोचले आहे. आर्थिक वर्ष २०२४ मध्ये कंपनीने ३९.११ दशलक्ष टन कोकिंग कोळसा उत्पादनाचा विक्रम प्रस्थापित केला.

बीसीसीएलचे कार्यक्षेत्र झारखंडमधील झरिया आणि पश्चिम बंगालमधील राणीगंज कोळसा क्षेत्रात पसरलेले असून, एकूण २८८.३१ चौरस किलोमीटरच्या भाडेपट्ट्यावर कंपनीचे कामकाज चालते. ३० सप्टेंबर २०२५ पर्यंत कंपनीकडे ३४ कार्यान्वित खाणींचे जाळे आहे, ज्यामध्ये ओपनकास्ट, भूमिगत आणि मिश्र खाणींचा समावेश आहे. तसेच, कंपनी वॉशरी प्रकल्प, एमडीओ आणि डब्ल्यूडीओ मॉडेलद्वारे खाणकाम पुन्हा सुरू करणे आणि सौर ऊर्जा प्रकल्पांचे मुद्रीकरणही करत आहे.

आर्थिक कामगिरीबाबत बोलायचे झाल्यास, ३० सप्टेंबर २०२५ रोजी संपलेल्या सहा महिन्यांत कंपनीचा कामकाजातून मिळणारा महसूल ५,६५९.०२ कोटी रुपये होता, तर निव्वळ नफा १२३.८८ कोटी रुपये नोंदवण्यात आला. आर्थिक वर्ष २०२५ मध्ये कंपनीचा महसूल १३,८०२.५५ कोटी रुपये आणि निव्वळ नफा १,२४०.१९ कोटी रुपये होता, जो मागील वर्षांच्या तुलनेत लक्षणीय वाढ दर्शवतो.

या आयपीओसाठी आयडीबीआय कॅपिटल मार्केट्स अँड सिक्युरिटीज लिमिटेड आणि आयसीआयसीआय सिक्युरिटीज लिमिटेड हे बुक-रनिंग लीड मॅनेजर्स म्हणून काम पाहत असून, केफिन टेक्नॉलॉजीज लिमिटेड ही या इश्यूची रजिस्ट्रार आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Suraj Chaugule


 rajesh pande