

मुंबई, 6 जानेवारी, (हिं.स.)। स्वदेशी SUV निर्माता कंपनी महिंद्रा अॅण्ड महिंद्राने भारतीय बाजारात आपली नवी महिंद्रा XUV 7XO अधिकृतपणे लाँच केली आहे. ही SUV 13.66 लाख रुपये (एक्स-शोरूम) इतक्या सुरुवातीच्या किमतीत उपलब्ध असून, ही किंमत पूर्वीच्या महिंद्रा XUV 700 इतकीच आहे. प्रत्यक्षात ही लोकप्रिय XUV 700 ची फेसलिफ्ट आवृत्ती असून, कंपनीने आता तिचे नाव बदलून XUV 7XO असे ठेवले आहे. नव्या नेमप्लेटसोबतच या SUV मध्ये डिझाइन आणि तंत्रज्ञानाच्या पातळीवर महत्त्वाचे बदल करण्यात आले आहेत, ज्यामुळे तिचा लुक अधिक मस्क्युलर आणि प्रीमियम वाटतो.
डिझाइनच्या बाबतीत XUV 7XO चा फ्रंट भाग आता अधिक स्क्वेअर आणि दमदार दिसतो. नवीन डिझाइनची ग्रिल, अधिक एंग्युलर ड्युअल-बॅरल LED प्रोजेक्टर हेडलॅम्प्स आणि आकर्षक LED डे-टाइम रनिंग लॅम्प्स यामुळे समोरील भाग अधिक आधुनिक भासतो. रीडिझाइन केलेल्या बंपरमध्ये सेंट्रल एअर इनटेकच्या दोन्ही बाजूंना ट्विन LED फॉग लॅम्प्स देण्यात आले आहेत. साइड प्रोफाइलमध्ये नव्या डिझाइनचे अलॉय व्हील्स लक्ष वेधून घेतात, तर मागील बाजूस नवीन टेललॅम्प्स आणि अपडेटेड रिअर बंपर देण्यात आला आहे.
केबिनमध्ये प्रवेश करताच XUV 7XO मधील मोठा बदल स्पष्टपणे जाणवतो. टॉप व्हेरिएंटमध्ये महिंद्रा XEV 9E आणि 9S मधून प्रेरित वाइड-स्क्रीन ट्राय-डिस्प्ले सेटअप देण्यात आला आहे. हे डिस्प्ले लेटेस्ट AdrenoX Plus सिस्टिमवर चालतात आणि को-ड्रायव्हरला कंटेंट स्ट्रीम करण्याची सुविधाही देतात. पुढील सीट्स पावर अॅडजस्टेबल असून, ड्रायव्हर सीटला मेमरी फंक्शन देण्यात आले आहे. को-ड्रायव्हर सीटमध्ये पावर्ड बॉस मोड असून, त्यामुळे मागील प्रवाशांना अधिक लेग रूम मिळते.
मागील प्रवाशांसाठीही महिंद्राने खास सोयी दिल्या आहेत. दुसऱ्या रांगेत बसणाऱ्यांसाठी वायरलेस चार्जिंग पॅड, दरवाजांवर सन ब्लाइंड्स आणि तिसऱ्या रांगेत जाण्यासाठी टम्बल फंक्शन देण्यात आले आहे. ग्राहकांना दुसऱ्या रांगेत बेंच सीट किंवा कॅप्टन चेअर्सचा पर्याय मिळतो. ही SUV एकूण सहा ट्रिम लेव्हलमध्ये उपलब्ध असून AX, AX3, AX5, AX7, AX7T आणि AX7 L असे पर्याय देण्यात आले आहेत.
महिंद्रा XUV 7XO: व्हेरिएंट्स आणि किंमत
महिंद्रा XUV 7XO च्या किमती १३.६६ लाख रुपयांपासून (एक्स-शोरूम) सुरू होतात. रेंज-टॉपिंग AX7L डिझेल-मॅन्युअल व्हेरिएंट पहिल्या ४०,००० खरेदीदारांसाठी २२.४७ लाख रुपये (एक्स-शोरूम) या प्रास्ताविक किमतीत सादर करण्यात आला आहे. दरम्यान, AX7 डिझेल-मॅन्युअल व्हेरिएंट १८.९५ लाख रुपये (एक्स-शोरूम) किमतीत उपलब्ध आहे.
फीचर्सच्या बाबतीत XUV 7XO अधिक प्रगत झाली आहे. यात लेव्हल-2 ADAS तंत्रज्ञान, ऑटो हेडलाइट्स आणि वायपर्स, मल्टी-झोन क्लायमेट कंट्रोल, वेंटिलेटेड आणि पावर्ड फ्रंट सीट्स, पावर्ड बॉस मोड, डॉल्बी अॅटमॉससह हरमन कार्डन साउंड सिस्टीम, 540-डिग्री कॅमेरा, मल्टी-डिव्हाइस स्ट्रीमिंग सपोर्ट, 65W टाइप-C USB आउटलेट आणि पॅनोरमिक सनरूफसारखी वैशिष्ट्ये देण्यात आली आहेत.
मेकॅनिकलदृष्ट्या मात्र या SUV मध्ये कोणताही मोठा बदल करण्यात आलेला नाही. XUV 7XO मध्ये XUV 700 मधीलच 2.0-लिटर टर्बो पेट्रोल आणि 2.2-लिटर डिझेल इंजिनचे पर्याय मिळतात. हे दोन्ही इंजिन मॅन्युअल आणि ऑटोमॅटिक गिअरबॉक्ससह उपलब्ध असून, टॉप डिझेल व्हेरिएंटमध्ये ऑल-व्हील ड्राइव्हचा पर्यायही देण्यात आला आहे. मात्र, महिंद्राने सस्पेन्शन सेटअपमध्ये सुधारणा करत नव्या ‘डेविंची’ डॅम्पर्सचा वापर केल्याचा दावा केला आहे, ज्यामुळे राइड क्वालिटी अधिक चांगली होईल.
---------------
हिंदुस्थान समाचार / Suraj Chaugule