
मुंबई, 06 जानेवारी (हिं.स.)। स्मार्टफोन उत्पादक कंपनी ओप्पोने भारतीय बाजारात आपला नवीन ओप्पो ए६ प्रो 5G स्मार्टफोन लॉन्च केला आहे. हा फोन दोन स्टोरेज पर्यायांमध्ये उपलब्ध करून देण्यात आला असून त्याची सुरुवातीची किंमत २१ हजार ९९९ रुपये ठेवण्यात आली आहे. कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, हा फोन एकदा पूर्ण चार्ज केल्यानंतर तब्बल ४० दिवस स्टँडबाय बॅटरी बॅकअप देतो, असा दावा करण्यात आला आहे. तसेच, हा स्मार्टफोन अवघ्या ६४ मिनिटांत १०० टक्के चार्ज होतो, यात ८०W वायर्ड फास्ट चार्जिंग सपोर्ट देखील देण्यात आला आहे. ही बाबही ग्राहकांचे विशेष लक्ष वेधून घेत आहे.
ओप्पो ए६ प्रो 5G खरेदीवर कंपनीकडून २,००० रुपयांचे इन्स्टंट डिस्काउंट देण्यात येत असून ही सवलत अॅक्सिस बँक, एचडीएफसी बँक आणि एयू स्मॉल फायनान्स बँकेच्या क्रेडिट कार्डवर उपलब्ध आहे. हा फोन कंपनीच्या अधिकृत वेबसाईटसह अमेझॉन आणि फ्लिपकार्ट या ई-कॉमर्स प्लॅटफॉर्मवर विक्रीसाठी उपलब्ध असून ऑरोरा गोल्ड आणि कॅप्युचिनो ब्राऊन या दोन आकर्षक रंगांमध्ये तो सादर करण्यात आला आहे.
किंमतीबाबत बोलायचे झाल्यास, ८ जीबी रॅम आणि १२८ जीबी स्टोरेज असलेल्या व्हेरिएंटची किंमत २१ हजार ९९९ रुपये आहे, तर ८ जीबी रॅम आणि २५६ जीबी स्टोरेज असलेला व्हेरिएंट २३ हजार ९९९ रुपयांना उपलब्ध आहे. या फोनमध्ये मीडियाटेक डायमेंसिटी ६३०० चिपसेटद्वारे समर्थित आहे. तसेच ६.७५ इंचाचा एचडी+ एलसीडी डिस्प्ले देण्यात आला आहे. या हँडसेटमध्ये ७,०००mAh क्षमतेची बॅटरी देण्यात आली आहे. फोटोग्राफीसाठी फोनच्या मागील बाजूस ड्युअल कॅमेरा सेटअप असून त्यात ५० मेगापिक्सेलचा मुख्य कॅमेरा आणि २ मेगापिक्सेलची मोनोक्रोम लेन्स देण्यात आली आहे. सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी १६ मेगापिक्सेलचा फ्रंट कॅमेरा मिळतो. हा फोन कलरओएस १५ सह अँड्रॉइड १५ वर चालतो.
विशेष म्हणजे, हा स्मार्टफोन IP66, IP68 आणि IP69 रेटिंगसह येतो, त्यामुळे पाणी आणि धुळीपासून तो अधिक सुरक्षित राहतो. दमदार बॅटरी, जलद चार्जिंग आणि मजबूत फीचर्समुळे ओप्पो ए६ प्रो 5G भारतीय बाजारात ग्राहकांसाठी एक आकर्षक पर्याय ठरण्याची शक्यता आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Suraj Chaugule