आधार लिंक नसल्यास आयआरसीटीसी बुकिंगवर मर्यादा
नवी दिल्ली, 06 जानेवारी (हिं.स.)। भारतीय रेल्वेनं मेल आणि एक्सप्रेस गाड्यांच्या आरक्षित तिकीट बुकिंगच्या नियमांमध्ये महत्त्वाचे बदल केले असून हे नियम 5 जानेवारीपासून लागू झाले आहेत. या नव्या नियमांमुळे आयआरसीटीसी खातं आधारशी लिंक आणि पडताळणी पूर्ण
IRCTC


नवी दिल्ली, 06 जानेवारी (हिं.स.)। भारतीय रेल्वेनं मेल आणि एक्सप्रेस गाड्यांच्या आरक्षित तिकीट बुकिंगच्या नियमांमध्ये महत्त्वाचे बदल केले असून हे नियम 5 जानेवारीपासून लागू झाले आहेत. या नव्या नियमांमुळे आयआरसीटीसी खातं आधारशी लिंक आणि पडताळणी पूर्ण असलेल्या प्रवाशांना थेट फायदा होणार आहे, तर आधार पडताळणी न केलेल्या यूजर्सना काही मर्यादांचा सामना करावा लागणार आहे.

रेल्वेच्या नव्या नियमानुसार, ज्या प्रवाशांनी आयआरसीटीसी खातं आधारशी लिंक केलं नाही, त्यांना सकाळी 8 ते दुपारी 4 या वेळेत आरक्षित तिकीट बुक करता येणार नाही. त्यामुळे अशा यूजर्सना कन्फर्म तिकीट मिळण्यात अडचणी येण्याची शक्यता आहे. आरक्षित तिकिटांचं बुकिंग प्रवासाच्या तारखेच्या 60 दिवस आधी सुरू होतं आणि या पहिल्या दिवशी आधार पडताळणी पूर्ण असलेल्यांनाच प्राधान्य देण्यात येणार आहे.

नव्या नियमानुसार, आधार पडताळणी पूर्ण केलेले यूजर्स 60 दिवस आधी सकाळी 8 वाजल्यापासून तिकीट बुक करू शकतील. मात्र, ज्यांचं आधार पडताळणी झालेलं नाही, त्यांना या कालावधीत तिकीट बुकिंगची परवानगी नसेल. याशिवाय, 12 जानेवारी 2026 पासून सकाळी 8 ते रात्री 12 या वेळेतही आधार पडताळणी न केलेल्या यूजर्सना तिकीट बुक करता येणार नाही.

आयआरसीटीसीनं 29 डिसेंबरपासूनच आधार पडताळणी केलेल्या यूजर्ससाठी बुकिंग शेड्यूलमध्ये बदल केले होते. सुरुवातीला अशा यूजर्सना सकाळी 8 ते 12 या वेळेत तिकीट बुकिंगची सुविधा देण्यात आली होती. त्यानंतर 5 जानेवारी 2026 पासून हा कालावधी वाढवून सकाळी 8 ते दुपारी 4 वाजेपर्यंत करण्यात आला आहे. 12 जानेवारीपासून हा कालावधी आणखी वाढवण्यात येणार असून, 60 दिवस आधी तिकीट बुक करणाऱ्या आधार पडताळणी केलेल्या प्रवाशांसाठी बुकिंग विंडो रात्री 12 वाजेपर्यंत खुली राहणार आहे.

रेल्वे प्रशासनानं स्पष्ट केलं आहे की, हे बदल खऱ्या प्रवाशांना कन्फर्म तिकीट मिळावं यासाठी करण्यात आले आहेत. दलाल, ब्रोकर किंवा अन्य संस्थांकडून तिकीट बुकिंगचा गैरवापर होऊ नये, तसेच पहिल्याच दिवशी तिकीट बुक करणाऱ्या प्रवाशांना अधिक संधी मिळावी, हा या नियमामागचा मुख्य उद्देश आहे.आयआरसीटीसी खातं आधारशी लिंक करण्यासाठी प्रवाशांना आयआरसीटीसीच्या वेबसाईट किंवा मोबाईल अ‍ॅपवर लॉगिन करावं लागेल. त्यानंतर ‘My Profile’ मध्ये जाऊन ‘आधार KYC’ हा पर्याय निवडून आधार क्रमांक टाकावा लागेल. नोंदणीकृत मोबाईलवर आलेला ओटीपी टाकल्यानंतर खातं आधारशी लिंक होईल.

दरम्यान, रेल्वे काऊंटरवर होणाऱ्या ऑफलाईन तिकीट बुकिंगच्या नियमांमध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही. हे नियम पूर्वीप्रमाणेच लागू राहणार आहेत. आधी आधार पडताळणी केलेल्या यूजर्ससाठी केवळ 15 मिनिटांची मर्यादित विंडो होती, ती आता वाढवून 4 तास करण्यात आली असून, पुढील टप्प्यात 8 तासांची ऑनलाईन बुकिंग विंडो उपलब्ध करून देण्यात येणार आहे. त्यामुळे नियमित प्रवाशांना आणि वेळेत नियोजन करणाऱ्यांना या नव्या नियमांचा निश्चितच फायदा होणार आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Suraj Chaugule


 rajesh pande