
मुंबई, 06 जानेवारी (हिं.स.)। जगातील सर्वात मोठ्या टेक शो ‘सीईएस 2026’च्या सुरुवातीपूर्वीच सॅमसंगने लास वेगासमध्ये तंत्रज्ञानप्रेमींचे लक्ष वेधून घेतले आहे. कंपनीने जगातील सर्वात मोठा 130 इंचाचा मायक्रो आरजीबी टीव्ही सादर केला असून, त्याचा आकार आणि डिझाइन दोन्हीही थक्क करणारे आहेत. हा टीव्ही इतका भव्य आहे की तो सांभाळण्यासाठी खास मोठा मेटल स्टँड देण्यात आला असून, या स्टँडच्या मदतीने स्क्रीन थोडी झुकवता येते.
ही रचना सॅमसंगच्या 2013 मधील ‘टाइमलेस गॅलरी’ स्टँडची आठवण करून देते. मात्र, सध्या हा टीव्ही केवळ ‘संकल्पना मॉडेल’ असल्याचे कंपनीने स्पष्ट केले असून तो तात्काळ बाजारात येणार नाही.
हा मायक्रो RGB टीव्ही मिनी LED तंत्रज्ञानाचे अधिक प्रगत रूप मानले जात आहे. OLEDसारखी स्पष्टता आणि जबरदस्त ब्राइटनेस ही त्याची मोठी वैशिष्ट्ये आहेत. रंगांची अचूकता आणि कॉन्ट्रास्ट इतका प्रभावी आहे की दृश्ये अधिक गडद, खोल आणि नैसर्गिक दिसतात. हा टीव्ही थेट भिंतीवरही लावता येतो, मात्र त्याचा खास स्टँडही भिंतीवरच बसवावा लागतो, कारण स्पीकर सिस्टीम त्याच स्टँडमध्ये समाविष्ट करण्यात आली आहे.
या टीव्हीमध्ये सॅमसंगने ‘मायक्रो RGB AI इंजिन प्रो’ प्रोसेसर दिला असून, ‘कलर बूस्टर प्रो’ आणि ‘एचडीआर प्रो’ तंत्रज्ञान एआयच्या मदतीने फिक्या आणि अस्पष्ट प्रतिमांनाही अधिक तेजस्वी आणि स्पष्ट बनवते. अंधार आणि प्रकाशातील सूक्ष्म फरकही ठळकपणे दिसतात. याशिवाय, स्क्रीन ‘ग्लेअर फ्री’ असल्यामुळे बाहेरील प्रकाशाचा परावर्तनाचा त्रास होत नाही. स्मार्ट फीचर्सच्या बाबतीतही हा टीव्ही आघाडीवर आहे. संवादाद्वारे शोध घेण्यासाठी ‘व्हिजन एआय कंपेनियन’ देण्यात आला असून, मायक्रोसॉफ्ट को-पायलट आणि परप्लेक्सिटीसारख्या एआय सेवांचाही सपोर्ट मिळतो. उत्तम ध्वनी अनुभवासाठी सॅमसंगचे ‘एक्लिप्सा ऑडिओ’ तंत्रज्ञान वापरण्यात आले आहे.
हा टीव्ही बाजारात आला, तर त्याची किंमत लाखोंमध्ये असण्याची शक्यता आहे. गेल्या वर्षी सॅमसंगने सादर केलेल्या 115 इंचाच्या मॉडेलची किंमत सुमारे 25 लाख रुपये होती, त्यामुळे 130 इंचाचा मायक्रो RGB टीव्ही त्याहूनही महाग असू शकतो. मायक्रो RGB आणि मायक्रो LED यामधील फरक स्पष्ट करताना कंपनीने सांगितले की मायक्रो RGB हे सुधारित मिनी LED तंत्रज्ञान आहे, तर मायक्रो LED हे OLEDसारखे स्वतः प्रकाश निर्माण करणाऱ्या पिक्सेलवर आधारित अत्यंत महागडे तंत्रज्ञान आहे. मोठी स्क्रीन आणि प्रचंड ब्राइटनेस हवी असलेल्या ग्राहकांसाठी मायक्रो RGB उपयुक्त ठरू शकते.
या टीव्हीसोबतच सॅमसंगने फ्रीज, वॉशिंग मशीनसह सर्व होम अप्लायन्सेसमध्ये AI समाविष्ट करण्याची घोषणा केली आहे. स्मार्टफोनपलीकडे जात आता स्मार्ट होम आणि कंझ्युमर इलेक्ट्रॉनिक्समध्ये AIचा व्यापक वापर करण्याचा कंपनीचा मानस असल्याचे यावेळी स्पष्ट झाले.
---------------
हिंदुस्थान समाचार / Suraj Chaugule