
नवी दिल्ली , 06 जानेवारी (हिं.स.)।नेपाळ पुन्हा एकदा हिंसाचाराच्या विळख्यात सापडला आहे. भारताच्या सीमेला लागून असलेल्या नेपाळमधील पारसा आणि धनुषा धाम जिल्ह्यांमध्ये हिंसाचार उसळला असून संपूर्ण परिसरात हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे. याच पार्श्वभूमीवर भारत–नेपाळ सीमा देखील सील करण्यात आली आहे.
धनुषा जिल्ह्यात एका मशिदीत तोडफोड झाल्यानंतर नेपाळमध्ये सांप्रदायिक हिंसाचाराला सुरुवात झाल्याचे सांगितले जात आहे. या घटनेची छायाचित्रे आणि व्हिडीओ सोशल मीडियावरही समोर आले आहेत. पारसा जिल्ह्याची सीमा भारतातील बिहारच्या रक्सौल जिल्ह्याला लागून आहे. यामुळे भारत–नेपाळ सीमा पूर्णपणे सील करण्यात आली असून मैत्री पूलासह सर्व सीमावर्ती प्रवेशबिंदूंवर ये-जा थांबवण्यात आली आहे. केवळ अत्यावश्यक सेवांना परवानगी देण्यात आली आहे. सीमा सुरक्षा दलाने (एसएसबी) अतिरिक्त सुरक्षा दल तैनात केले असून ये-जा करणाऱ्या प्रत्येकाची कडक तपासणी केली जात आहे.
पारसा जिल्ह्यातील बीरगंज येथे हिंसक आंदोलनांवर नियंत्रण मिळवण्यासाठी पोलिसांनी अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या. या कारवाईत अनेक पोलिस कर्मचारी जखमी झाल्याची माहिती आहे. सुरक्षेच्या दृष्टीने सीमावर्ती भागात डॉग स्क्वॉडची पथकेही तैनात करण्यात आली आहेत. एसएसबी अधिकारी आणि इतर सुरक्षा यंत्रणांच्या माहितीनुसार, केवळ मैत्री पूलच नव्हे तर सहदेवा, महादेवा, पनटोका, सिवान टोला आणि मुशहरवा या इतर सीमावर्ती भागांमध्येही गस्त वाढवण्यात आली आहे. कोणतीही अनुचित घटना घडू नये यासाठी प्रत्येक हालचालीवर काटेकोर नजर ठेवली जात आहे.
नेपाळ पोलिसांच्या माहितीनुसार, धनुषा जिल्ह्यातील सखुवा मारान परिसरात काही लोकांनी एकत्र येऊन मशिदीत तोडफोड केली. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल झाला. त्यानंतर हिंदू समुदायाविरोधात द्वेषपूर्ण वक्तव्ये समोर आली. सोशल मीडियावरील या घटनांचा परिणाम होत मुस्लिम समुदायातील काही तरुणांनी हिंसक आंदोलनांना सुरुवात केली.
बीरगंज आणि आसपासच्या भागातील परिस्थिती बिघडल्यामुळे नेपाळमध्ये काम करणारे अनेक भारतीय कामगार आपल्या घरी परतू लागले आहेत.
---------------
हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode