
सिंहभूम, 07 जानेवारी (हिं.स.) : झारखंडच्या पश्चिम सिंहभूम जिल्ह्यात जंगली हत्तीच्या हल्ल्यात 7 जणांचा मृत्यू झाला आहे. नोवामुंडी प्रखंडातील बाबरिया गावात 6 जानेवारीच्या रात्री एकाच कुटुंबातील 5 पाच जणांचा मृत्यू झाला, तर मोठा पासिया आणि लांपाईसाई गावांतही प्रत्येकी एका ग्रामस्थाचा जीव गेला. घटनेनंतर परिसरात दहशतीचे वातावरण असून वन विभाग आणि प्रशासनाने नुकसानभरपाई व सुरक्षेचे आश्वासन दिले आहे.
यासंदर्भातील माहितीनुसार, सर्वजण आपल्या घरात झोपले असताना हत्तीने अचानक घरावर हल्ला केला. या हल्ल्यात कुटुंबातील एक मूल कसेबसे प्राण वाचवण्यात यशस्वी झाले. बाबरिया गावातील मृतांमध्ये सनातन मेराल, त्यांची पत्नी जोंकों कुई, त्यांची दोन लहान मुले आणि मोगदा लागुरी यांचा समावेश आहे. हत्तीचा धुमाकूळ केवळ बाबरिया गावापुरता मर्यादित राहिला नाही. मोठा पासिया गावातही हत्तीच्या हल्ल्यात एका ग्रामस्थाचा मृत्यू झाला. तसेच लांपाईसाई गावातही हत्तीने चिरडून एका अन्य ग्रामस्थाचा जीव घेतला. या दोन्ही गावांतील मृतांची ओळख अद्याप पटलेली नाही. घटनेनंतर संपूर्ण परिसरात भीतीचे वातावरण आहे. माहिती मिळताच वन विभाग आणि प्रशासनाची पथके घटनास्थळी दाखल झाली आहेत. हत्तीवर नजर ठेवली जात असून बाधित कुटुंबांना नुकसानभरपाई देणे आणि सुरक्षेचे उपाय करण्याचे आश्वासन देण्यात आले आहे.
-------------------
हिंदुस्थान समाचार / मनीष कुलकर्णी