
नवी दिल्ली, 07 जानेवारी (हिं.स.) : राजधानी दिल्लीच्या तुर्कमान गेट परिसरात फैज-ए-इलाही मशिदीजवळ अतिक्रमण हटवण्याच्या कारवाईदरम्यान मोठा गोंधळ उडाला. दिल्ली उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार महापालिकेने मंगळवारी मध्यरात्रीनंतर अतिक्रमणविरोधी मोहीम राबवली. या कारवाईदरम्यान काही समाजकंटकांनी पोलिसांवर दगडफेक केली, ज्यात पाच पोलीस कर्मचारी जखमी झाले.
अतिक्रमण हटवण्यासाठी सुमारे 17 बुलडोझर आणि 32 जेसीबी मशिन तैनात करण्यात आली होती. रामलीला मैदानाजवळील तुर्कमान गेट परिसरात सुमारे 4000 चौरस मीटर क्षेत्रातील बेकायदेशीर संरचना पाडण्यात आल्या. यावेळी दिल्ली पोलिसांनी कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी मोठ्या प्रमाणावर बंदोबस्त तैनात केला होता. संपूर्ण परिसर नऊ झोनमध्ये विभागण्यात आला असून प्रत्येक झोनची जबाबदारी अतिरिक्त पोलीस उपायुक्त दर्जाच्या अधिकाऱ्यांकडे सोपवण्यात आली होती. संवेदनशील ठिकाणी विशेष पोलीस तुकड्या तैनात करण्यात आल्या होत्या. कारवाईपूर्वी स्थानिक नागरिक आणि अमन कमिटीच्या सदस्यांसोबत अनेक समन्वय बैठका घेण्यात आल्या होत्या. मात्र, कारवाईदरम्यान काही समाजकंटकांनी दगडफेक करत वातावरण बिघडवण्याचा प्रयत्न केला. परिस्थितीची गंभीरता लक्षात घेऊन पोलिसांनी सौम्य बळाचा वापर करत तात्काळ नियंत्रण मिळवल्याचे पोलिसांनी सांगितले.
केंद्रीय रेंजचे संयुक्त पोलीस आयुक्त मधुर वर्मा म्हणाले की, न्यायालयाच्या आदेशाची अंमलबजावणी करताना कायदा व सुव्यवस्था राखणे हे सर्वोच्च प्राधान्य होते. परिस्थिती वेळीच नियंत्रणात आणल्यामुळे कोणताही मोठा तणाव निर्माण झाला नाही, असे त्यांनी स्पष्ट केले. दरम्यान, सिटी एसपी झोनचे उपआयुक्त विवेक अग्रवाल यांनी सांगितले की, दगडफेकीत कोणतीही जीवितहानी झाली नाही. मलबा हटवण्याचे काम पुढील 24 तासांत पूर्ण करण्याचे प्रयत्न सुरू आहेत.दिल्ली पोलिस आणि महापालिका प्रशासनाने शहरात शांतता कायम ठेवण्याचे आवाहन नागरिकांना केले आहे.
-------------------------
हिंदुस्थान समाचार / मनीष कुलकर्णी