
नांदेड, 8 जानेवारी, (हिं.स.)। हजरत हाजी सय्याह सरवरे मगदूम सय्यद सईदोद्दीन रफाई यांच्या ७११ व्या उरुसानिमित्त कंधारच्या उरूस मैदानात पारंपरिक कुस्त्यांच्या दंगलींनी थराराची परिसीमा गाठली. या दंगलीतील शेवटची लढत बामणीच्या जगतापच्या पराक्रमाने गाजली. उदगीरच्या केंद्रे मल्लावर अटीतटीच्या लढतीत मात करून जगतापने विजय संपादन केला.
७११ व्या उरुसात कुस्त्यांच्या दंगलींनी उरूस मैदान दणाणले. या दंगलीतील शेवटची आणि सर्वाधिक उत्कंठावर्धक कुस्ती बामणी (ता. कंधार) येथील दमदार मल्ल परमेश्वर काशीनाथ जगताप आणि कुट्टी (ता. उदगीर) येथील मल्ल सुमित केंद्रे यांच्यात रंगली. दोन्ही मल्लांनी ताकद, डावपेच आणि जिद्दीचे दर्शन घडवत मैदानातील प्रत्येक क्षण रोमहर्षक केला.
अटीतटीच्या या झुंजीत परमेश्वर जगताप यांनी अनुभवाचा पुरेपूर वापर करत केंद्रे याला खेळवत-खेळवत अखेर जोरदार धोबीपछाड देत चीत केले. या निर्णायक डावानंतर उरूस मैदान जगताप जगताप” च्या घोषणांनी दणाणून गेले. या देदिप्यमान विजयासाठी परमेश्वर जगताप यांना प्रथम बक्षीस प्रदान करण्यात आले. उरूसातील कुस्त्यांनी केवळ खेळाची नव्हे, तर ग्रामीण मल्लविद्येच्या गौरवशाली परंपरेची साक्ष दिली. श्रद्धा, परंपरा आणि शौर्य यांचा संगम साधणाऱ्या या दंगलींमुळे उरुसोत्सव अधिकच तेजस्वी झाला. यावेळी उरूस कमिटीचे अध्यक्ष मोहम्मद जफरोद्दीन, नगरसेवक मन्नान चौधरी, नगरसेवक समीरउल्ला चाऊस, पोलीस निरीक्षक चंद्रकांत जाधव, गुलाम बाबा, सय्यद सलीम, शेख मुखीद, गुलाम मुख्तार, मोहम्मद जफर यांच्यासह कुस्तीप्रेमी व भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
---------------
हिंदुस्थान समाचार / Sangita Hanumant Rao Chitanis