
नवी मुंबई, 08 जानेवारी (हिं.स.)महिला प्रीमियर लीग (WPL) २०२६ शुक्रवारपासून सुरू होत आहे. स्पर्धेच्या पहिल्या सामन्यात दोन वेळची विजेती हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखालील मुंबई इंडियन्सचा सामना रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (RCB) शी होणार आहे. बंगळुरुचा संघ स्मृती मानधनाच्या नेतृत्वाखालील एकमेव WPL चॅम्पियन संघ आहे. WPL चा चौथा हंगाम नवी मुंबई आणि वडोदरा येथे दोन टप्प्यात आयोजित केला जात आहे. यामुळे क्रिकेटपटूंना जून-जुलैमध्ये इंग्लंडमध्ये होणाऱ्या T20 विश्वचषकासाठी त्यांच्या तयारीची चाचणी घेण्याची संधी मिळणार आहे.
कागदावर मुंबई इंडियन्सचा संघ बराच मजबूत दिसतो. भारतीय कर्णधार हरमनप्रीत व्यतिरिक्त, त्यांच्याकडे इंग्लंडची कर्णधार नॅट सायव्हर ब्रंट आणि वेस्ट इंडिजची कर्णधार हेली मॅथ्यूज सारख्या अनुभवी क्रिकेटपटूंचाही समावेश आहे. मुंबईने त्यांच्या बहुतेक क्रिकेटपटूंना कायम ठेवले आहे, ज्यामुळे त्यांना पराभूत करणे कोणत्याही संघासाठी आव्हानात्मक बनले आहे. न्यूझीलंडची अमेलिया केर, ऑस्ट्रेलियाची मिली इलिंगवर्थ आणि भारताची विश्वासार्ह अमनजोत कौर यांच्या उपस्थितीमुळे मुंबईची फलंदाजी आणखी मजबूत झाली आहे. शबनीम इस्माईल मुंबईच्या गोलंदाजीचे नेतृत्व करणार आहे. ज्यामध्ये सईका इशाकचाही समावेश आहे.
आरसीबीची मदार ही कर्णधार स्मृती मानधनावर असणार आहे. या हंगमात ऐलिस पेरी संघात नसल्यानं बंगळुरुला याचा मोठा फटका बसणार आहे. तिच्या अनुपस्थितीत रॉयल चॅलेंजर्सच्या संघाला या सामन्यात मुंबईल पराभूत करण्यासाठी कमालीचे कष्ट करावे लागणार आहे. ऑस्ट्रेलियन फलंदाज जॉर्जिया वोल, अष्टपैलू ग्रेस हॅरिस आणि दक्षिण आफ्रिकेची आक्रमक अष्टपैलू नादिन डी क्लार्क फलंदाजीची जबाबदारी सांभाळतील. आरसीबीकडे रिचा घोषच्या रूपात सक्षम यष्टीरक्षक आणि फिनिशर आहे. भारताची अरुंधती रेड्डी, पूजा वस्त्राकर आणि इंग्लंडची लॉरेन बेल हे आरसीबीच्या प्रमुख वेगवान गोलंदाजांमध्ये आहेत. त्यांच्याकडे इंग्लंडची लिन्सी स्मिथ, भारताची राधा यादव आणि श्रेयंका पाटील सारखे दर्जेदार फिरकी गोलंदाज देखील आहेत.
२८ दिवस चालणाऱ्या या स्पर्धेत पाच संघांमध्ये २२ सामने होणार आहेत. एलिमिनेटर ३ फेब्रुवारी रोजी वडोदरा येथे आणि अंतिम सामना ५ फेब्रुवारी रोजी होईल. हे सामने दोन ठिकाणी खेळवले जातील. नवीन हंगामापूर्वी पाचपैकी दोन संघांनी त्यांचे कर्णधार बदलले आहेत. WPL लीग स्वरूपात खेळवण्यात येईल. पाचही संघ एकमेकांविरुद्ध दोन सामने खेळतील, म्हणजेच प्रत्येक संघ स्पर्धेत आठ सामने खेळेल. लीग स्टेज संपल्यानंतर, पॉइंट टेबलमध्ये अव्वल स्थानावर असलेला संघ थेट अंतिम फेरीत पोहोचेल. दुसऱ्या आणि तिसऱ्या स्थानावर असलेले संघ एलिमिनेटर खेळतील, जो अंतिम फेरीसाठी देखील पात्र ठरेल. चौथ्या आणि पाचव्या स्थानावर असलेले संघ बाहेर पडतील.
मुंबई इंडियन्स हा WPL मधील सर्वात यशस्वी संघ आहे. त्यांनी तिन्ही हंगामात प्लेऑफमध्ये प्रवेश केला आणि दोनदा विजेतेपद जिंकले. २०२४ मध्ये संघ अंतिम फेरीत पोहोचू शकला नाही, एलिमिनेटरमध्ये RCB कडून पराभव पत्करावा लागला होता. त्या हंगामात बंगळुरूनेही विजेतेपद जिंकले. गुजरात आणि उत्तर प्रदेश संघ अद्याप अंतिम फेरीत पोहोचलेले नाहीत.
---------------
हिंदुस्थान समाचार / वृषाली देशपांडे