
जेरुसलेम, 26 फेब्रुवारी (हिं.स.)।इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू आणि भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यात घनिष्ठ संबंध आहेत. मागील १२ वर्षांत राजकीय संबंधांपलीकडे जाऊन दोघेही वैयक्तिक पातळीवरही अत्यंत आत्मीयतेने भेटताना दिसले आहेत. नऊ वर्षांनंतर इस्रायल दौऱ्यावर गेलेल्या पंतप्रधान मोदी यांची भेट घेताना नेतन्याहू यांनी भारतीय पोशाख परिधान करून आपल्या भारतीय समकक्षांना आश्चर्यचकित केले.
नेतन्याहू यांना ‘बीबी’ या टोपणनावानेही ओळखले जाते. त्यांनी पंतप्रधान मोदींसोबतच्या भेटीतील खास क्षणांचा एक व्हिडिओही शेअर केला आहे. विशेष म्हणजे, नेतन्याहू यांनी आपल्या अधिकृत इन्स्टाग्राम हँडलवर हिंदी भाषेत खास संदेशही लिहिला आहे. भारतीय पोशाखातील नेतन्याहू यांचे फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत. तसेच, दोन्ही नेते एका कारमध्ये बसलेले असलेला एक फोटोही चर्चेत आहे. राष्ट्रप्रमुखांसोबत पंतप्रधान मोदींचे कारमधील फोटो त्यांच्या ‘कार डिप्लोमसी’चा भाग म्हणूनही पाहिले जातात.
पंतप्रधान मोदींच्या सन्मानार्थ आयोजित करण्यात आलेल्या संयुक्त रात्रीच्या जेवणापूर्वी इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांनी भारतीय पारंपरिक पोशाख परिधान करून त्यांना आश्चर्याचा धक्का दिला. याची झलक शेअर करत त्यांनी इन्स्टाग्रामवर लिहिले, “आपल्या संयुक्त रात्रीच्या जेवणापूर्वी मी माझे मित्र पंतप्रधान मोदी यांना पारंपरिक भारतीय पोशाख घालून आश्चर्यचकित केले.”
यापूर्वी स्वागतावेळी एक हलकाफुलका क्षणही चर्चेचा विषय ठरला. नेतन्याहू यांनी पंतप्रधान मोदी यांच्या पोशाखातील केशरी पॉकेट स्क्वेअरकडे इशारा करत त्याची तुलना आपल्या पत्नीच्या ड्रेसच्या रंगाशी केली. त्यावर पंतप्रधान मोदी हसत म्हणाले, “हो, केशरी,” आणि दोन्ही नेत्यांमध्ये हास्यविनोदाचा माहोल रंगला. नेतन्याहू यांची पत्नी सारा नेतन्याहू यांनीही भारताला अद्भुत देश म्हणत पुन्हा भारत भेट देण्याची इच्छा व्यक्त केली. तसेच, नेतन्याहू यांनी पंतप्रधान मोदी यांचे कौतुक करत त्यांना “अद्भुत नेता” असे संबोधले.
---------------
हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode