
ब्रासीलिया, 26 फेब्रुवारी (हिं.स.)।ब्राझीलमध्ये निसर्गाचा भीषण कहर पाहायला मिळत आहे. दक्षिण-पूर्व ब्राझीलमध्ये झालेल्या मुसळधार पावसामुळे आणि अचानक आलेल्या पुरामुळे मृतांचा आकडा सातत्याने वाढत असून आतापर्यंत ४६ जणांचा मृत्यू झाला आहे. अनेक जण बेपत्ता असून त्यांचा शोध सुरू आहे. शेकडो नागरिकांना आपली घरे सोडावी लागली आहेत. दक्षिण-पूर्वेकडील मिनास गेरैस राज्यात पुरस्थिती गंभीर झाली आहे.
ब्राझीलच्या दक्षिण भागात मुसळधार पावसामुळे अचानक आलेल्या पुरामुळे मोठ्या प्रमाणावर हानी झाली आहे. हवामान तज्ज्ञांनी पुढील काही दिवसांत या भागात आणखी पावसाची शक्यता वर्तवली आहे. मिनास गेरैस राज्यात बचावकार्य वेगाने सुरू असून बचाव पथके परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी प्रयत्न करत आहेत. अनेक घरे आणि वसाहती चिखल व ढिगाऱ्याखाली दबल्या गेल्या आहेत.
यापूर्वी बुधवारी ब्राझीलच्या अग्निशमन विभागाने सुधारित आकडेवारी जाहीर करत मृतांचा आकडा ४६ झाल्याची माहिती दिली. सुमारे २१ जण अद्याप बेपत्ता आहेत. राज्य अग्निशमन विभागाच्या माहितीनुसार, जुईज दे फोरा आणि उबा या शहरांमध्ये पूर व भूस्खलनामुळे सुमारे ३,६०० लोक विस्थापित झाले आहेत. ही दोन्ही शहरे सुमारे ११० किलोमीटर अंतरावर आहेत.
मृतांमध्ये ११ वर्षीय बर्नार्डो लोपेस दुत्रा याचाही समावेश आहे. मुसळधार पावसामुळे त्याचे घर कोसळल्याने त्याचा मृत्यू झाला. त्याची आई आणि बहीण सध्या रुग्णालयात उपचार घेत आहेत. दरम्यान, ब्राझीलचे राष्ट्राध्यक्ष लुईज इनासियो लुला दा सिल्वा यांनी मंगळवारी सांगितले की, बचावकार्यासाठी सुरक्षा दलांना पाचारण करण्यात आले असून पावसामुळे प्रभावित नागरिकांना तातडीची मदत पुरवली जात आहे. तसेच, डोंगराळ भाग, दऱ्या आणि उतारांजवळील भागात आरोग्य पथकेही पाठवण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली.
---------------
हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode