अभिषेकने दमदार खेळीने टीकाकारांची तोंडे बंद केली - सुनील गावस्कर
चेन्नई, 27 फेब्रुवारी (हिं.स.)।भारतीय संघाचे दिग्गज फलंदाज सुनील गावस्कर यांनी अभिषेक शर्मा याचे जोरदार कौतुक केले आहे. अभिषेकने झिम्बाब्वेविरुद्ध टी-२० विश्वचषकाच्या सुपर-८ सामन्यात शानदार अर्धशतक झळकावत दमदार पुनरागमन केले. मात्र, त्याची संयमी आण
अभिषेकने दमदार खेळीने टीकाकारांची तोंडे बंद केली - सुनील गावस्कर


चेन्नई, 27 फेब्रुवारी (हिं.स.)।भारतीय संघाचे दिग्गज फलंदाज सुनील गावस्कर यांनी अभिषेक शर्मा याचे जोरदार कौतुक केले आहे. अभिषेकने झिम्बाब्वेविरुद्ध टी-२० विश्वचषकाच्या सुपर-८ सामन्यात शानदार अर्धशतक झळकावत दमदार पुनरागमन केले. मात्र, त्याची संयमी आणि बचावात्मक फलंदाजी पाहून गावस्कर आश्चर्यचकित झाले. तरीही त्यांनी म्हटले की या खेळीने अभिषेकने टीकाकारांची तोंडे बंद केली.

गावस्कर म्हणाले, “आपल्याला माहिती आहे की अभिषेक शर्मा किती गुणी फलंदाज आहे. झिम्बाब्वेविरुद्धची ५५ धावांची खेळी त्याने टीकाकारांना दिलेले योग्य उत्तर आहे. नैसर्गिक आक्रमक खेळ सुरू करण्यापूर्वी त्याने वेळ घेतला. त्याच्या फलंदाजीत शिस्त आणि नियोजन दिसत होते. ऑफ-स्पिनरचा त्याने आदर राखला,कोणताही अविचारी फटका खेळला नाही आणि शांतपणे, संयमाने डाव उभारला. त्याने काही चेंडू रोखलेदेखील. हे पाहून मला आश्चर्य वाटले, कारण आपण सहसा अभिषेकला असे खेळताना पाहत नाही.”

गावस्कर यांनी पुढे सांगितले की हा काळ अभिषेकसाठी शिकण्याचा आहे. ते म्हणाले, “मला खरोखर वाटते की त्याच्यासाठी ही उत्तम शिकवण आहे. प्रत्येक क्रिकेटपटू सलग दोन-तीन सामन्यांत धावा न होण्याचा काळ अनुभवतो. महत्त्वाचे म्हणजे त्यातून तुम्ही काय शिकता. मला वाटते अभिषेकने बरेच काही शिकले आहे आणि कोलकात्यात वेस्ट इंडिजविरुद्ध होणाऱ्या महत्त्वाच्या सामन्यात त्याचा फायदा होईल.”

सॅमसनला संधी का मिळाली, यावर बोलताना गावस्कर म्हणाले की दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पराभवानंतर भारतीय संघाने तात्काळ धडा घेतला आणि उजव्या-डाव्या हाताच्या फलंदाजी संयोजनासाठी सॅमसनला वरच्या क्रमांकावर परत आणले. त्यांनी इशारा दिला की कोलकात्यात होणारा सामना जवळपास बाद फेरीसारखा असेल आणि भारताने वेस्ट इंडिजच्या आक्रमक फलंदाजीपासून सावध राहायला हवे.

झिम्बाब्वेविरुद्धच्या सामन्यापूर्वी अभिषेक खराब फॉर्मशी झुंज देत होता. पोटाच्या तक्रारीनंतर तो सलग तीन वेळा शून्यावर बाद झाला होता. त्याच्यावर टीका वाढत होती आणि संघावरही दबाव होता. मात्र या सामन्यात त्याची देहबोली पूर्णपणे वेगळी दिसली. पहिल्याच चेंडूवर एकेरी धाव घेत त्याने घाई न करण्याचा स्पष्ट संकेत दिला. संजू सॅमसन याच्यासोबत त्याने पहिल्या विकेटसाठी ४८ धावांची भागीदारी केली. सॅमसन बाद झाल्यानंतर अभिषेकने गती वाढवत अर्धशतक पूर्ण केले.

टी-२० विश्वचषक २०२६ मधील सलग चार डावांमध्ये अपयशी ठरल्यानंतर अभिषेकने गुरुवारी झिम्बाब्वेविरुद्धच्या सुपर-८ सामन्यात पुन्हा फॉर्म गाठला. त्याने ३० चेंडूंमध्ये ५५ धावा करत संघाला तुफानी सुरुवात करून मोठ्या धावसंख्येची पायाभरणी केली. भारताने चार बाद २५६ धावांपर्यंत मजल मारली.

---------------

हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode


 rajesh pande