
कॅनबेरा, 26 फेब्रुवारी, (हिं.स.) - जागतिक विजेत्या भारतीय महिला संघाचे ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या दुसऱ्या महिला एकदिवसीय सामन्यात फलंदाजी सुधारण्याचे लक्ष्य असणार आहे. जेणेकरून तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेत संघाचे आव्हान कायम राहील. टी-२० मालिका २-१ ने जिंकल्यानंतर भारताच्या एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेची सुरुवात निराशाजनक पद्धतीने केली. त्यांना ब्रिस्बेनमध्ये सहा विकेट्सने पराभव सहन करावा लागला. भारतीय महिला संघाने ऑस्ट्रेलियाविरुद्ध कधीही द्विपक्षीय एकदिवसीय मालिका जिंकलेली नाही. त्यामुळे हा इतिसाह बदलण्यासाठी भारतीय महिला संघाला कांगारुंना दुसऱ्या एकदवीय सामन्यात पराभूत करावेच लागणार आहे.
पहिल्या एकदिवसीय सामन्यात भारतीय संघ केवळ २१४ धावांवरच गारद झाला होता. उपकर्णधार स्मृती मानधना (५८), कर्णधार हरमनप्रीत कौर (५३) आणि कश्वी गौतम (४३) वगळता इतर कोणत्याही भारतीय फलंदाजाला मोठी खेळी करता आली नाही आणि ऑस्ट्रेलियाच्या शिस्तबद्ध गोलंदाजीसमोर त्यांना संघर्ष करावा लागला. फलंदाजीची सुरुवात करताना प्रतिका रावल शून्यावर बाद झाली, तर शफाली वर्मा, जेमिमा रॉड्रिग्ज आणि दीप्ती शर्मा देखील फारशी कमाल करु शकल्या नाहीत. दुसऱ्या सामन्यात आता भारताला या चौघीकडून चांगल्या कामगिरीची अपेक्षा असेल. यष्टीरक्षक रिचा घोष देखील संघर्ष करत होती आणि संघाला आशा असणार आहे की ती शेवटच्या षटकांमध्ये फटकेबाजी करत मोलाचे योगदान देईल.
मालिकेत पिछाडीवर असल्याने, भारतीय संघ व्यवस्थापन अष्टपैलू अमनजोत कौर आणि स्नेह राणा यांना संधी देण्याची शक्यता आहे. भारताची अष्टपैलू क्रिकेटपटू दीप्ती दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात दमदार पुनरागमन करून मालिकेत बरोबरी साधण्याची आशा करत आहे. ती म्हणाली की, एक संघ म्हणून आम्ही खेळलो पण निकाल आमच्या बाजूने लागला नाही. पुढच्या सामन्यात आम्ही अधिक मजबूत पुनरागमन करू,
ऑस्ट्रेलियाकडून हीली आणि फोबी लिचफिल्ड यांनी फलंदाजीत सातत्यपूर्ण कामगिरी केली आहे. त्यामुळे या सामन्यात या दोघी हीच लय कायम राखण्यास उत्सुक असतील. ऑस्ट्रेलियाची गोलंदाजीही उत्तम झाली आहे. मेगन शट, अॅशले गार्डनर, अलाना किंग, ताहिला मॅकग्रा आणि सोफी मोलिनेक्स या तिघांनीही किफायतशीर गोलंदाजी तर केलीच आणि विकेट्सही घेतल्या आहेत. आता भारतीय संघ मालिकेत जोरदार पुनरागमन करण्यात यशस्वी ठरतो, की ऑस्ट्रेलियन संघ विजयी आघाडी घेतो याकडेच तमाम क्रिकेट चाहत्यांचं लक्ष असणार आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / वृषाली देशपांडे