
बीड, 28 फेब्रुवारी (हिं.स.)। गेवराई शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात उभारण्यात आलेल्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या भव्य अश्वारूढ पुतळ्याच्या प्रस्तावित स्थलांतराविरोधात शिवभक्तांनी पुकारलेले धरणे आंदोलन अखेर यशस्वी झाले.
या आंदोलनानंतर नगर परिषद प्रशासन आणि शिवप्रेमी यांच्यात झालेल्या सविस्तर चर्चेअंती पुतळा सध्याच्या ठिकाणीच ठेवण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला. प्रशासनाने पुढील सर्व आवश्यक कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करण्याचे आश्वासन दिल्याने शिवप्रेमींमध्ये आनंदाचे वातावरण आहे.
शिवप्रेमींनी उत्स्फूर्तपणे छत्रपती शिवाजी महाराज चौकात भव्य अश्वारूढ पुतळा बसवून त्याचे अनावरण केले होते. मात्र, त्यानंतर वाहतूक कोंडी आणि प्रशासकीय कारणांचा दाखला देत हा पुतळाअन्यत्र हलविण्याच्या हालचाली सुरू असल्याची चर्चा शहरात पसरली. या चर्चेमुळे शिवभक्तांमध्ये संतापाची लाट उसळली शेकडो तरुण, ज्येष्ठ नागरिक व विविध संघटनांचे पदाधिकारी चौकात जमा झाले. जय भवानी, जय शिवाजी च्या घोषणांनी संपूर्ण परिसर दणाणून गेला होता.
प्रशासनाने संवेदनशीलतेने निर्णय घेतल्यामुळे गेवराई शहरातील तणावपूर्ण वातावरण निवळले आहे. विविध सामाजिक व राजकीय संघटनांनी या आंदोलनाला पाठिंबा दिल्याने हा विषय भावनिक व संवेदनशील बनला होता. प्रशासनाच्या आश्वासनानंतर धरणे आंदोलन मागे घेण्यात आले असले, तरी आता पुढील कायदेशीर प्रक्रिया प्रशासन कशा प्रकारे आणि किती वेळेत पूर्ण करते, याकडे संपूर्ण शहराचे लक्ष लागले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis