
बीड, 28 फेब्रुवारी (हिं.स.)।
राज्य शासनाच्या कृषी विभागाने पुरस्कारांची संपूर्ण प्रक्रिया डिजिटल केली असून, आता सन्मानाची ही वाट एका क्लिकवर सोपी झाली आहे.
यापूर्वी कृषी पुरस्कारांसाठी अर्ज करताना शेतकऱ्यांना मोठी आर्थिक झळ सोसावी लागत होती. किचकट प्रक्रियेमुळे अनेक प्रयोगशील शेतकरी स्पर्धेबाहेरच राहायचे. हीच अडचण ओळखून आता ऑनलाइन संगणकीय प्रणाली विकसित करण्यात आली आहे.
सन २०२५ पासूनचे सर्व कृषी पुरस्कार अर्ज आता ऑनलाइन प्रणालीद्वारेच स्वीकारले जाणार आहेत. जिल्ह्यातील जास्तीत जास्त शेतकरी, महिला आणि संस्थांनी या सुविधेचा लाभ घेऊन आपले प्रस्ताव सादर करावेत.
विभागाच्या अधिकृत संकेतस्थळावर (https://krishi.maharashtra. gov.in) जाऊन कृषी पुरस्कार या टॅबमध्ये आपले अर्ज सादर करता
येतील. यामध्ये डॉ. पंजाबराव देशमुख कृषीरत्न, वसंतराव नाईक कृषिभूषण, जिजामाता कृषिभूषण यांसारख्या मानाच्या पुरस्कारांचा समावेश आहे.
मोबाइल किंवा संगणकावरून अर्ज करण्याची सुविधा. आर्थिक बचतः झेरॉक्स, फाइल्स आणि प्रवासाचा खर्च पूर्णपणे वाचणार. पारदर्शकताः आपला अर्ज कोणत्या पातळीवर प्रलंबित आहे, याची माहिती क्षणार्धात मिळेल.एकदा अपलोड केलेली कागदपत्रे पुन्हा पुन्हा देण्याची गरज उरणार नाही.
---------------
हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis