
मुंबई, 28 फेब्रुवारी (हिं.स.) - मुंबईतील हवेची गुणवत्ता टिकवून ठेवण्यासाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या पर्यावरण व हवामान बदल विभाग तसेच प्रशासकीय विभागनिहाय (वॉर्ड) यांनी फेब्रुवारी २०२६ या महिन्यात व्यापक आणि कठोर कारवाई केली. दिनांक २ फेब्रुवारी ते २७ फेब्रुवारी २०२६ या कालावधीत मुंबई महानगरातील विविध प्रभागांमध्ये एकूण १,०८२ ठिकाणी तपासणी करण्यात आली.
मुंबईतील हवेची गुणवत्ता आरोग्यदायी राहावी, यासाठी बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासन विविध उपायोजना राबवित आहे.
बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या विभाग स्तरावर केलेल्या तपासणी दरम्यान खासगी बांधकामे, महानगरपालिकेची कामे तसेच इतर विकास प्राधिकरणांची कामे यांची स्वतंत्र वर्गवारी करण्यात आली. पर्यावरण नियमांचे उल्लंघन करणाऱ्या कामांवर तात्काळ कारवाई करत १३५ बांधकामांना ‘कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली. तसेच ९३ बांधकामांना काम थांबविण्याची नोटीस बजावण्यात आली आहे.
याच कालावधीत काही बांधकामांच्या ठिकाणी पर्यावरण नियमांचे पालन करण्यात येत असल्याचे आढळून आले. तसेच ४८ जणांना बजाविण्यात आलेली काम थांबविण्याची नोटीस मागे घेण्यात आली आहे.
रस्त्यांची सखोल स्वच्छता
हवेतील धूलिकणांचे प्रमाण कमी करण्यासाठी महानगरपालिकेने सार्वजनिक रस्ते आणि इतर ठिकाणी सखोल स्वच्छता मोहीम राबवली आहे. पाण्याच्या टँकरद्वारे १,४५४.०९ किलोमीटर अंतराएवढ्या रस्त्यांची स्वच्छता करण्यात आली. तसेच ६८४.८ किलोमीटर अंतरावरील रस्त्यांवर मिस्टिंग मशिन्सचा वापर करण्यात आला.
पर्यावरणाचे संवर्धन साधण्यासाठी उपाययोजना
पर्यावरण संवर्धनासाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेने विविध उपाययोजना हाती घेतल्या आहेत. केवळ दंडात्मक नव्हे तर प्रतिबंधात्मक आणि सुधारात्मक उपाययोजनाही राबवल्या जात आहेत. हवेची गुणवत्ता आरोग्यदायी ठेवणे आणि पर्यावरण संवर्धन साधणे, हा या मोहिमेचा मुख्य उद्देश असल्याचे पर्यावरण विभागाने स्पष्ट केले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / सुधांशू जोशी