
बीड, 28 फेब्रुवारी (हिं.स.)। केज मतदारसंघात अवकाळी पाऊस, गारपीट, वादळी वाऱ्यामुळे रब्बी हंगामातील पिकांचे नुकसान झाले असून, बाधित शेतकऱ्यांना तातडीने मदत मिळावी म्हणून आमदार नमिता अक्षय मुंदडा यांनी पिकांचे तातडीने पंचनामे करून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्याची मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद जाधव पाटील यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे.
केज, अंबाजोगाई व बीड तालुक्यात सलग दोन दिवस आलेल्या अवकाळी पावसामुळेकाढणीस आलेली गहू, हरभरा, बाजरी आणि भाजीपाला पिके भुईसपाट झाली आहेत. अनेक ठिकाणी मळणीसाठी काढून ठेवलेले पीक भिजल्याने शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान झाले आहे. वादळी वाऱ्यामुळे आंबा बागांनाही मोठा फटका बसला आहे. आधीच बाजारभाव समाधानकारक नसल्याने आर्थिक संकटात असलेल्या शेतकऱ्यांच्या तोंडाशी आलेला घास या पावसामुळे हिरावला गेल्याची भावना व्यक्त होत आहे.प्रशासनाने या परिस्थितीचे गांभीर्य ओळखून बाधित भागांत तत्काळ पंचनामे करण्याचे आदेश द्यावेत आणि नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी तातडीने आर्थिक मदत जाहीर करावी, अशी आग्रही विनंती आमदार मुंदडा यांनी पत्रातून केली आहे.
------------------
हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis