
लातूर, 28 फेब्रुवारी (हिं.स.)।उदगीर तालुक्यातील लोहारा येथे दारू पिण्यासाठी पैसे न दिल्याच्या कारणावरून मुलाने स्वतः च्या आईवर काठीने हल्ला करून तिला जखमी केल्याची गंभीर घटना घडली आहे. या प्रकरणी उदगीर ग्रामीण पोलीस ठाणे येथे संबंधित मुलाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मिरा राजकुमार स्वामी (वय ४८, रा. लोहारा ता. उदगीर) यांनी दिलेल्या तक्रारीवरून त्यांचा मुलगा अजय राजकुमार स्वामी (रा. लोहारा ता. उदगीर) याच्याविरोधात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. घटनेचा प्रकार २१ फेब्रुवारी रोजी रात्री सुमारे नऊ वाजण्याच्या सुमारास त्यांच्या राहत्या घरी घडला. तक्रारीत नमूद केल्याप्रमाणे, आरोपीने आईकडे दारू पिण्यासाठी ५०० रुपयांची मागणी केली. मात्र आईने पैसे देण्यास नकार दिल्यानंतर त्याने संतापाच्या भरात शिवीगाळ करत लाथाबुक्यांनी मारहाण केली. त्यानंतर हातातील काठीन तिच्या डोक्यावर प्रहार करून जखमी केले. इतकेच नव्हे तर पैसे दिले नाहीस तर तुला संपवून टाकीन, अशी धमकी देत जीवितास धोका निर्माण केला, असे फिर्यादीत म्हटले आहे. या हल्ल्यात मिरा स्वामी यांना डोक्याला दुखापत झाली असून त्यांच्यावर उपचार करण्यात आले आहेत. घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून कुटुंबातील वाद विकोपाला गेल्याची चर्चा सुरू आहे. प्रकरणाचा पुढील तपास पोलीस कर्मचारी गडदे करीत आहेत. आरोपीविरुद्ध संबंधित कलमान्वये गुन्हा नोंदवून अधिक तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis