
जळगाव, 28 फेब्रुवारी, (हिं.स.) - चोरट्या वाळू वाहतुकीविरोधात जळगाव जिल्हा पोलीस दलाने धरणगाव तालुक्यातील बांभोरी, टाकरखेडा, खेडी व परिसरात पहाटे मोठी संयुक्त कारवाई करत अवैध वाहतुकीला जबर दणका दिला. या मोहिमेत ३२ ट्रॅक्टर, ८ डंपर जप्त करण्यात आले आहे. जप्त वाहने पोलिस मुख्यालय परिसरात लावण्यात आली आहेत.जळगाव जिल्ह्यात वाळूमाफियांनी धुमाकूळ घातला असून अनेकवेळा कारवाईसाठी जाणाऱ्या महसूल अधिकारी, कर्मचाऱ्यावर हल्ले करण्यात आल्याच्या घटना दिसून आल्या आहे.
दरम्यान, गिरणा व तापी नदीतून मोठ्या प्रमाणात वाळू उपसा होत असतो. या वाळू उपशाला आळा बसावा म्हणून पोलिस प्रशासन, महसूल विभाग व प्रादेशिक परिवहन विभागाच्यावतीने कारवाई हाती घेण्यात आली. जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांच्या निर्देशानुसार शुक्रवारी पहाटे पाच वाजताच पोलिस पथक बांभोरी गावात पोहोचले व कारवाई सुरू केली.या धाडीसाठी सुमारे दीडशे ते दोनशे अधिकारी व कर्मचाऱ्यांचा ताफा तैनात करण्यात आला होता. नियोजनबद्ध पद्धतीने राबविण्यात आलेल्या या कारवाईमुळे वाळूची बेकायदेशीर वाहतूक करणाऱ्यांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / मनोहर कांडेकर