
रायगड, 28 फेब्रुवारी (हिं.स.)। अलिबाग येथे जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था, रायगड व रायगड जिल्हा सहकारी पतसंस्था महासंघ यांच्या संयुक्त विद्यमाने सहकारी पतसंस्थांसाठी एक दिवसीय प्रशिक्षण कार्यशाळा उत्साहात व शिस्तबद्ध वातावरणात पार पडली. ही कार्यशाळा रायगड जिल्हा मध्यवर्ती बँक यांच्या अलिबाग येथील मुख्य कार्यालयाच्या सभागृहात आयोजित करण्यात आली होती.
जिल्ह्यातील ९४ सहकारी पतसंस्थांचे एकूण २४७ प्रतिनिधी तसेच सर्व तालुक्यांचे सहाय्यक निबंधक उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलनाने झाली. कार्यशाळेचे उद्घाटन जिल्हा उपनिबंधक तनवीर पाटील यांच्या हस्ते झाले. प्रमुख उपस्थिती म्हणून अॅड. जे. टी. पाटील (अध्यक्ष, महासंघ) व मंदार वर्तक (मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा मध्यवर्ती बँक) उपस्थित होते. मान्यवरांनी सहकार क्षेत्रातील पारदर्शकता, शिस्त आणि कायदेशीर जागृतीचे महत्त्व अधोरेखित केले. प्रास्ताविक सहाय्यक निबंधक सौ. रेखा गावडे यांनी केले. सहकार विभागाच्या नवीन नियमावली, परिपत्रके व मार्गदर्शक तत्त्वांचे काटेकोर पालन करण्यासाठी अशा प्रशिक्षण उपक्रमांची आवश्यकता असल्याचे त्यांनी नमूद केले. पहिल्या सत्रात “सहकार विभागाचे नवीनतम परिपत्रके व मार्गदर्शक तत्त्वे” या विषयावर सदानंद दिक्षित (माजी मुख्य कार्यकारी अधिकारी, पिपल्स को-ऑप बँक, पुणे) यांनी मार्गदर्शन केले. त्यांनी लेखापरीक्षण शिस्त, पारदर्शक कारभार व सदस्यांशी प्रभावी संवाद यावर भर दिला. दुपारच्या सत्रात “प्रभावी वसुलीसाठी पुनर्प्राप्ती व्यवस्थापन व कायदेशीर पावले” या विषयावर त्यांनी सखोल विवेचन करत कर्जवसुलीतील अडचणी व उपाय स्पष्ट केले. प्रश्नोत्तर सत्रात प्रतिनिधींच्या शंकांचे समाधान करण्यात आले. समारोपप्रसंगी प्रमाणपत्र वितरण करण्यात आले. सचिव योगेश मगर यांनी आभार प्रदर्शन करत भविष्यातही अशा उपक्रमांद्वारे सहकार क्षेत्र अधिक सक्षम करण्याचा निर्धार व्यक्त केला. उपस्थितांनी या कार्यशाळेमुळे प्रशासकीय व कायदेशीर जाणिवा अधिक दृढ झाल्याची भावना व्यक्त केली.
---------------
हिंदुस्थान समाचार / संदेश साळुंके