
सोलापूर, 28 फेब्रुवारी (हिं.स.)।
पंढरपूर नगरपालिकेच्या पाणी पुरवठा विभागाकडे जलसंपदा विभागाची तब्बल सहा कोटी 50 लाख रूपयांची थकबाकी आहे. थकबाकी वसुलीसाठी जलसंपदा विभागाने तगादा लावला आहे.
सात दिवसांमध्ये थकीत पाणी पट्टीची रक्कम भरा अन्यथा पाणी पुरवठा बंद जाईल अशी नोटीसही जलसंपदा विभागाने पालिकेला दिली आहे. पालिकेने वेळेत थकबाकी वेळेत भरली नाही, तर ऐन उन्हाळ्याच्या तोंडावर शहरातील नागरिकांवर जल संकट ओढवण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
मागील चार ते पाच वर्षांपासून नगरपालिकेच्या पाणी पुरवठा विभागाकडे जलसंपदा विभागाची सुमारे सहा कोटी 50 लाख रूपयांची थकबाकी आहे. थकबाकी भरण्यासंदर्भात जलसंपदा विभागाने नगरपालिकेला वेळोवेळी तोंडी व लेखी कळवले आहे. त्यानंतर नगरपालिकेने काही रक्कम भरली आहे. तथापी थकीत रक्कम मोठी असल्याने जलसंपदा विभागाने थेट पाणी पुरवठा बंद करण्याचा इशारा दिला आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड