रत्नागिरी : कोकम करी रेस्टॉरंटच्या पाककला महास्पर्धेत प्रज्ञा फडके सर्वोत्कृष्ट
रत्नागिरी, 28 फेब्रुवारी, (हिं. स.) : रत्नागिरी जिल्ह्यात कोकणच्या समृद्ध, पारंपरिक आणि लुप्त होत चाललेल्या रेसिपींचा वारसा जपण्याच्या उद्देशाने आयोजित करण्यात आलेली रत्नागिरी पाककला महास्पर्धा अंबर हॉल येथे उत्साहात व दिमाखात पार पडली. सौ. प्रज्ञा
रत्नागिरी : कोकम करी रेस्टॉरंटच्या पाककला महास्पर्धेत प्रज्ञा फडके सर्वोत्कृष्ट


रत्नागिरी, 28 फेब्रुवारी, (हिं. स.) : रत्नागिरी जिल्ह्यात कोकणच्या समृद्ध, पारंपरिक आणि लुप्त होत चाललेल्या रेसिपींचा वारसा जपण्याच्या उद्देशाने आयोजित करण्यात आलेली रत्नागिरी पाककला महास्पर्धा अंबर हॉल येथे उत्साहात व दिमाखात पार पडली. सौ. प्रज्ञा जयंत फडके यांना कायनाचं पिठलं ही लुप्त आणि शिवकालीन पाककृती बनवून अंतिम महाविजेत्या म्हणून यांना घोषित करण्यात आले.

या स्पर्धेसाठी रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली, गुहागर, चिपळूण, संगमेश्वर, राजापूर तसेच शहर परिसरातून स्पर्धकांनी सहभाग नोंदवला होता. हॉटेल कार्निव्हलचे संचालक उदय लोध, रस्टिक हॉलिडेजच्या संचालिका सौ. शिल्पा करकरे आणि नवनिर्माण हॉटेल मॅनेजमेंटच्या प्रा. शेफ मेघना शेलार यांनी परीक्षक म्हणून काम पाहिले.

स्पर्धेच्या पहिल्या फेरीत १५० रेसिपींची नोंदणी झाली होती. त्यापैकी काटेकोर परीक्षणानंतर ७५ रेसिपी अंतिम फेरीसाठी निवडण्यात आल्या. अंतिम फेरीत जिल्ह्यातील ७५ महिला स्पर्धकांनी परीक्षकांसमोर लाइव्ह पाककला सादर केली. जिल्ह्यात अशी लाइव्ह स्पर्धा पहिल्यांदाच झाली असे स्पर्धकांनी सांगितले. सकाळी ९ ते सायंकाळी ५ या वेळेत विविध पारंपरिक, नावीन्यपूर्ण आणि घरगुती चवींचा अनोखा मेळ अनुभवायला मिळाला.

स्पर्धेचे परीक्षण चव, सुगंध, पोत, पदार्थासाठी लागणारी सामग्री व कृती, स्वच्छता, सजावट या निकषांवर आधारित होते.

बक्षीस वितरण रत्नागिरी जिल्हा हॉटेल असोसिएशनचे अध्यक्ष रमेश कीर यांच्या उपस्थितीत झाले. या वेळी सौ. नमिता कीशर, सौ. श्वेता काळोखे, महेश सावंत, उमेश (भाई) वायंगणकर, जयेश पटेल, श्रेयश सावंत, डॉ. नितीन सनगर, रश्मीन दुर्वे, नितीन करकरे अमोल मोरे यांच्या हस्ते सर्व स्पर्धकांना सन्मानचिन्ह व प्रशस्तीपत्र देऊन गौरवण्यात आले. पाककलेत भाग घेतलेल्या सर्व स्पर्धकांना सुहाना मसाले यांच्याकडून भेटवस्तू दिली. राघव एंटरप्रायझेसकडून अंतिम महाविजेत्याला एक विशेष भेट दिली व सर्व स्पर्धकांना खरेदीवर 30 टक्के सवलतीच कुपन देण्यात आली.

स्पर्धेचा सविस्तर निकाल असा -

*शाकाहारी*- प्रथम सौ. श्रावणी संतोष मयेकर (पाककृती- चोळक्या भाकरी व हिंग चटणी.) द्वितीय सौ. सुलभा फणसळकर (खतखत), तृतीय सौ. विद्या विनायक शिर्के, (ओल्या नारळाचे गोड वडे.)

*मत्स्याहारी* प्रथम - सौ. मीनाक्षी आतिष किर (खेकडा भुर्जी), द्वितीय सौ. अंतरा राहुल कळंबटे (पानगा मासा), तृतीय सौ. अवंतिका राकेश तिवरेकर (झटपट मुळ्याचं कुवल).

*मांसाहारी*- प्रथम सौ. स्वप्नाली संजय भागवत (मातीच्या भांड्यातील काळं चिकन), उत्तेजनार्थ सौ. साक्षी समीर चव्हाण (कुळथाची थाळी), उत्तेजनार्थ सौ. संगिता संदीप आंबेरकर (भरला बोंबील फ्राय).

रमेश कीर यांनी अध्यक्षीय भाषणात सांगितले की, स्वयंपाकघरातील गृहिणींना प्रतिष्ठा देणारी ही स्पर्धा आहे, तसेच डेस्टिनेशन रत्नागिरी साठी सर्व हॉटेल्सना या रेसिपी मिळाव्यात, या जुन्या रेसिपिंचा एक दस्तावेज बनवावा.

मैत्री ग्रुपचे संचालक कौस्तुभ सावंत यांनी प्रस्तावना करताना सांगितले की शाकाहारी रत्नागिरी किंवा चिकन रत्नागिरी नावाची डिश रत्नागिरीच्या सर्व हॉटेल्सच्या मेनू कार्डमध्ये असावी. ही स्पर्धा केवळ एक स्पर्धा नव्हती, तर कोकणच्या पारंपरिक चवींचा, लॉस्ट रेसिपींचा आणि घराघरातील संस्कृतीचा एक भव्य उत्सव ठरली.

जिल्ह्यातील महिलांनी आपल्या कलेचा उत्कृष्ट आविष्कार सादर करून कोकणच्या खाद्यसंस्कृतीला नवी ऊर्जा दिली, असे मैत्री ग्रुपचे संचालक सुहास ठाकुरदेसाई यांनी सांगितले.

---------------

हिंदुस्थान समाचार / रत्नागिरी


 rajesh pande