
लातूर, 28 फेब्रुवारी (हिं.स.)महानगरपालिकेच्या वतीने कर वसुली मोहीम सुरू करण्यात आली आहे. या मोहिमेस सहकार्य करून मालमत्ताधारकांनी आपल्या चालू व थकीत कराचा भरणा करावा. कर न भरल्यास मालमत्तेची जप्ती करून लिलाव करण्यात येणार आहे. त्यामुळे नागरिकांनी लवकरात लवकर कराचा भरणा करावा, असे आवाहन मनपा आयुक्त मानसी मीना यांनी केले आहे.
फेब्रुवारी महिना संपत आला असून काही नागरिकांकडे मागील कर थकीत आहे. चालू वर्षाचा करही थकीत असून नागरिक कर भरण्यास टाळाटाळ करीत आहेत. महानगरपालिकेच्या कर संकलन व कर आकारणी विभागाने वसुलीची धडक मोहीम सुरू केली आहे.
मालमत्ता कर व पाणीपट्टी कराची थकबाकी मोठ्या प्रमाणात असल्याने, यापुढील काळात कर न भरल्यास जप्ती मोहीम राबविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. कर न भरणाऱ्या नागरिकांच्या मालमत्ता जप्त करण्यासाठी प्रत्येक क्षेत्रीय कार्यालयात २ जप्ती पथके कार्यान्वित करण्यात आली आहेत.
मालमत्ता जप्त करूनही कर भरणा न केल्यास मालमत्तांचा लिलाव करण्यात येणार आहे. मनपाच्या वतीने स्थापन करण्यात आलेल्या १२ पथकांतील १०० कर्मचारी मालमत्ताधारकांना भेटून कर भरण्याचे आवाहन करणार आहेत. त्यामुळे नागरिकांनी आपल्या थकबाकी व चालू वर्षातील देय मालमत्ता कर व पाणीपट्टी कराची रक्कम एकरकमी भरून जप्तीसारखी कटू कार्यवाही टाळावी, असे आवाहन आयुक्त मानसी मीना यांनी केले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis