
संस्थेच्या आवारात सामूहिक हनुमान चालीसा पठण साठी मोठी गर्दी
नाशिक, 28 फेब्रुवारी, (हिं.स.) : त्र्यंबकेश्वर रोडवरील नामांकित संदीप फाउंडेशन या शैक्षणिक संस्थेत सामूहिक नमाज पठण झाल्याच्या घटनेनंतर शहरात संस्थेविषयी प्रचंड नाराजी निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर शनिवारी ( दि.२८) सकल हिंदू समाजाच्या वतीने संस्थेच्या आवारात सामूहिक हनुमान चालीसा पठण करण्यात आले. यावेळी मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते.
काही दिवसांपूर्वी संदीप फाउंडेशन संस्थेच्या परिसरात एका विशिष्ट समुदायाकडून सामूहिक नमाज पठण करण्यात आल्याचा व्हिडिओ समोर आला होता. शैक्षणिक संस्थेत धार्मिक कार्यक्रम झाल्याच्या पार्श्वभूमीवर काही संघटनांनी आक्षेप नोंदवला होता. त्याच्या निषेधार्थ आज हनुमान चालीसा पठणाचे आयोजन करण्यात आले.
हनुमान चालीसा पठणानंतर सकल हिंदू समाजाच्या प्रतिनिधींनी संस्थेच्या प्रशासनाशी चर्चा केली. यावेळी प्रशासनाने नमूद केले की, संबंधित घटनेची त्यांना पूर्वकल्पना नव्हती. तसेच या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेऊन अंतर्गत समिती स्थापन करण्यात आली असून, चौकशीअंती योग्य ती कारवाई केली जाईल, असे स्पष्ट करण्यात आले. संस्थेने नेहमीच सर्व धर्मांचा आदर केला असल्याचे प्रशासनाने सांगितले. हिंदू सण आणि उत्सवांना यापूर्वीही पाठिंबा दिला असून भविष्यातही तो कायम राहील, असे आश्वासन देण्यात आले.
चौकट ...
ज्ञानाची केंद्रे की वाद निर्माण करणारी संस्था
यावेळी उपस्थित प्रतिनिधींनी शैक्षणिक संस्था या ज्ञानाची केंद्रे असल्याचे नमूद करत, परिसरात कोणत्याही प्रकारचे धार्मिक वाद निर्माण होऊ नयेत, अशी भूमिका मांडली. भविष्यात अशा घटना घडू नयेत, यासाठी योग्य ती खबरदारी घेण्याची मागणी करण्यात आली.
---------------
हिंदुस्थान समाचार / GOSAVI CHANDRASHEKHAR SUKDEV