
नांदेड, 28 फेब्रुवारी (हिं.स.)राज्यातील घोषित, अघोषित आणि अंशतः अनुदानित शाळांवरील शिक्षकांची गेल्या २५ वर्षापासूनची विनावेतन व अत्यल्प वेतनातील वेठबिगारी आता थांबवावी, अशी हाक मराठवाडा शिक्षक संघाने दिली आहे. या शाळा व तुकड्यांना तात्काळ १०० टक्के अनुदान लागू करावे, या मागणीसाठी संघाचे अध्यक्ष सूर्यकांत विश्वासराव, राजकुमार कदम यांनी मुख्यमंत्री व शालेय शिक्षणमंत्र्यांना निवेदन दिले. जिल्हाध्यक्ष व्ही. आर. चिलवरवार यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे मांडल्यानुसार, २००९ मध्ये शाळांच्या मान्यतेतील कायम शब्द काढल्यानंतर २०१२ पर्यंत प्रचलित सूत्रानुसार अनुदान देण्याचे आश्वासन देण्यात आले होते. मात्र, आज १६ वर्षे उलटूनही अनेक शिक्षक केवळ २० ते ८० टक्के वेतनावर उदरनिर्वाह करत आहेत.
हिंदुस्थान समाचार / Sangita Hanumant Rao Chitanis